आर्चरच्या बाऊन्सरने स्मिथ कोसळला, पहिल्यांदाच या नियमाचा वापर

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ऍशेसमध्ये क्रिकेट रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकला.

Updated: Aug 18, 2019, 06:07 PM IST
आर्चरच्या बाऊन्सरने स्मिथ कोसळला, पहिल्यांदाच या नियमाचा वापर title=

लंडन : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ऍशेसमध्ये क्रिकेट रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकला. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने टाकलेला बाऊन्सर स्टीव्ह स्मिथच्या मानेला लागला आणि तो जागेवरच कोसळला. या मॅचमध्ये झालेल्या दुखापतीमुळे स्टीव्ह स्मिथ या दुसऱ्या टेस्टला मुकणार आहे. पण आयसीसीच्या नव्या नियमानुसार मार्नस लाबुसचग्ने याला स्मिथचा बदली खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे.

१ ऑगस्टपासून आयसीसीचे नवे नियम लागू झाले, त्यानुसार मैदानात खेळाडूला गंभीर दुखापत झाली, तर या खेळाडूला बदली खेळाडू देण्यात यावा. पण हा बदल खेळाडूनुसार असावा, म्हणजेच बॅट्समन दुखापतग्रस्त झाला, तर त्याच्याऐवजी बॅट्समन आणि बॉलर दुखापतग्रस्त झाला, तर त्याच्याऐवजी बॉलरचीच बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात यावी. कनकशन सबस्टिट्यूट, असं नाव या नियमाला देण्यात आलं. त्यामुळे मार्नस लाबुसचग्ने हा पहिला कनकशन सबस्टिट्यूट खेळाडू ठरला आहे.

शनिवारी जोफ्रा आर्चरने टाकलेला बाऊन्सर स्मिथला लागल्यानंतर तो जवळपास ४० मिनिटं मैदानाबाहेर होता. यानंतर प्रथमोपचार आणि काही चाचण्यांनंतर स्मिथ मैदानात उतरला. ८० रनवर मैदानाबाहेर गेलेला स्मिथ ९२ रन करून आऊट झाला.

रविवारी उठल्यानंतर स्टीव्ह स्मिथचं डोकं दुखत आहे, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलं. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोणताही धोका न पत्करता स्मिथसाठी कनकशन सबस्टिट्यूटची मागणी आयसीसीकडे केली. २२ ऑगस्टपासून तिसऱ्या टेस्टला सुरुवात होणार आहे. या मॅचसाठीही स्मिथचं फिट होणं मुश्कील वाटत आहे.

स्मिथ मैदानात कोसळल्यानंतर जोफ्रा आर्चर स्मिथला बघायलाही गेला नाही. उलट आर्चर बटलरसोबत उभा राहून हसत असल्याचं दिसत होतं. स्मिथ पडल्यानंतर आर्चरच्या चेहऱ्यावरील हास्यमुद्रा आणि त्याचा वावर पाहता खेळाची ही बाजू अत्यंत निराशाजनक असल्याचीच प्रतिक्रिया अनेक क्रीडारसिकांनी दिली. आर्चरने टाकलेला हा बॉल १४२ किमी प्रती तासाच्या वेगाने होता.