अर्जुन तेंडुलकरचा पुन्हा धमाका, ६ विकेट घेतल्या

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 

Updated: Nov 4, 2018, 05:53 PM IST
अर्जुन तेंडुलकरचा पुन्हा धमाका, ६ विकेट घेतल्या title=

मुंबई : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अर्जुन तेंडुलकरनं केसी महेंद्र शिल्ड अंडर १९ स्पर्धेमध्ये विजय मर्चंट इलेव्हन या टीमकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरनं विजय मांजरेकर इलेव्हन विरुद्ध ७० रन देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. अर्जुन तेंडुलकरची ही कामगिरी योग्य वेळी आल्याचं बोललं जात आहे. अर्जुनची नजर आता भारताची ए टीम आणि भारताच्या अंडर-१९ टीमवर आहे.

अर्जुन तेंडुलकरच्या शानदार बॉलिंगमुळे विजय मांजरेकर इलेव्हनला फक्त २१६ रन करता आले. या कामगिरीमुळे अर्जुनची टीम ही मॅच जिंकली. काहीच दिवसांपूर्वी विनू मंकड ट्रॉफीमध्येही अर्जुनची कामगिरी उल्लेखनीय झाली होती. गुजरातविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईकडून खेळताना अर्जुननं ५ विकेट घेतल्या होत्या. या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला होता.

कूच बिहार ट्रॉफीमध्येही ५ विकेट

अंडर-१९ कूच बिहार ट्रॉफीमध्ये रेल्वेविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईकडून खेळताना अर्जुननं ११ ओव्हरमध्ये ४४ रन देऊन ५ विकेट घेतल्या होत्या. यामुळे मुंबईचा रेल्वेवर एक इनिंग आणि १०३ रननी विजय झाला होता. आसाम विरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुननं १५ ओव्हरमध्ये ४४ रन देऊन ४ विकेट घेतल्या होत्या. त्याच्या एक महिना आधी मध्य प्रदेशविरुद्ध याच स्पर्धेत अर्जुननं ५ विकेट घेतल्या होत्या.

ऑल राऊंडर असलेला अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या अंडर-१४ आणि अंडर-१६ टीमचा हिस्सा आहे. याचवर्षी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अंडर-१९ यूथ टेस्टमध्येही अर्जुनची निवड झाली होती. भारतीय टीमला सराव म्हणून अर्जुनला नेटमध्येही बॉलिंग करताना पाहण्यात आलंय. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजवेळीही अर्जुननं भारतीय टीमला बॉलिंग टाकली होती.

२०१७ साली ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचआधी अर्जुन तेंडुलकरनं भारतीय टीमला बॉलिंग केली होती. मागच्या वर्षी झालेल्या महिला वर्ल्ड कपवेळीही अर्जुननं भारतीय महिला टीमला नेटमध्ये सराव दिला.

इंग्लंडच्या बॉलरना सराव देत असताना अर्जुनच्या बॉलिंगवर जॉनी बेअरस्टोला दुखापत झाली होती.