या वयात म्हणजे? पुनरागमानाबद्दल बोलताना रहाणेचा प्रतिप्रश्न; म्हणाला, "माझ्यात अजूनही..."

Ajinkya Rahane About His Age: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान 12 जुलैपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी अजिंक्यला केवळ संघात स्थान मिळालंय असं नाही तर त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 11, 2023, 02:10 PM IST
या वयात म्हणजे? पुनरागमानाबद्दल बोलताना रहाणेचा प्रतिप्रश्न; म्हणाला, "माझ्यात अजूनही..." title=
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान 12 जुलैपासून खेळवला जाणार पहिला कसोटी सामना

Ajinkya Rahane About His Age: भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) मागील वर्षी कसोटी संघामधून वगळण्यात आलं होतं. मात्र रहाणे त्यानंतर घरगुती क्रिकेटमध्ये अनेक सामने खेळला. त्याने या सामन्यांमध्ये खोऱ्यानं धावा ओढल्या असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. त्यानंतर 2023 च्या इंडियन प्रिमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतानाही राहणेनं दमदार खेळी केली. याच कामगिरीच्या जोरावर रहाणेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी संघात स्थान मिळालं. या सामन्यामध्ये भारताकडून मैदानात टिकून राहिलेल्या खेळाडूंमध्ये केवळ अजिंक्य रहाणेच टिकून राहिला. त्याने पहिल्या डावात अर्थशतक झळकावलं.

माझ्यात बरंच क्रिकेट शिल्लक

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील कामगिरीच्या जोरावर अजिंक्यने आणखीन एक झेप घेतली. त्याला आगामी वेस्ट इंडिज सिरीजसाठी केवळ संघात स्थान देण्यात आलं नाही तर त्याच्याकडे उपकर्णधारपदही देण्यात आलं. रहाणे हा सध्या 35 वर्षांचा आहे. मात्र आपल्या वयाबद्दल बोलताना त्याने आपण वयस्कर झाल्यासारखं वाटत नसल्याचं सांगितलं आहे. माझ्यात बरंच क्रिकेट शिल्लक आहे असंही रहाणेनं सांगितलं. 

या वयात म्हणजे?

अजिंक्य रहाणेला या वयामध्ये पुनरागमन करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना रहाणेनं, "या वयात म्हणजे? मी अजूनही तरुण आहे. माझ्यात बरंच क्रिकेट शिल्लक आहे," असं उत्तर दिलं. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याआधी रहाणेनं आपल्या तयारीबद्दलही या मुलाखतीत माहिती दिली. मागील दीड वर्षांपासून मी माझ्या फलंदाजीच्या शैलीमध्ये काही सुधारणा केल्या आहेत असं अजिंक्यने सांगितलं.

भविष्याचा विचार करत नाही

"माझ्यासाठी आयपीएलचं पर्व छान होतं. माझी घरगुती क्रिकेटमधील कामगिरीही चांगली होती. मला आता माझ्या फलंदाजीवर अधिक विश्वास वाटू लागला आहे. मी सध्या क्रिकेट आणि फलंदाजीचा आनंद घेतोय. मी भविष्याबद्दल फारसा विचार करणार नाही. प्रत्येक सामना हा वैयक्तिक स्तरावर तसेच संघांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो," असंही रहाणेनं सांगितलं.

मागील काही महिन्यांमध्ये नक्की काय बदल झाला?

मागील काही महिन्यांपासून तुला सर्वच फॉरमॅटमध्ये छान कामगिरी करत समाधानकारक धावा करता येत आहेत. नेमक्या कोणत्या बदलामुळे हे शक्य झालं, असं रहाणेला विचारण्यात आलं. "काही विशेष बदल झालेला नाही. सीएसकेने मला जे स्वातंत्र्य हवं होतं ते दिलं. खेळाडू म्हणून तुमच्यावर काही जबाबदारी सोपवण्यात येते ती तुम्ही पार पाडणं अपेक्षित असते. पूर्वी माझं काम हे सलामीला येण्याचं होतं. सीएसकेने मला फलंदाजीचं स्वातंत्र्य दिलं. जास्तीत जास्त धावा करण्यासाठी मी खेळतो. मला दिलेली भूमिका पार पाडणं हे फार महत्त्वाचं वाटतं. आता मला रोहित शर्माने दिलेली जबाबदारी पार पाडायची असून मी नक्कीच यासाठी संपूर्ण प्रयत्न करेन," असं रहाणे म्हणाला. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानचा सामना 12 जुलैपासून पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे.