Test Cricket: 1-2 नाही तर 3 सामन्यांची टेस्ट सिरीज आवश्यक; क्रिकेटमध्ये होणार ऐतिहासिक बदल?

Test Cricket: या बैठकीत समितीने एक निवेदन जारी केलं. समितीने जारी केलेल्या निवेदनात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सिरीजमध्ये निर्णायक सामना न झाल्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आलाय.

सुरभि जगदीश | Updated: Feb 10, 2024, 09:27 AM IST
Test Cricket: 1-2 नाही तर 3 सामन्यांची टेस्ट सिरीज आवश्यक; क्रिकेटमध्ये होणार ऐतिहासिक बदल? title=

Test Cricket: मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) कडून टेस्ट क्रिकेट संदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची शिफारस करण्यात आली आहे. मेरिलबोन क्रिकेट क्लबने केलेल्या शिफारशीनुसार, किमान तीन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात यावी. याशिवाय द्विपक्षीय सिरीजमध्ये पाहुण्या टीमचा खर्च घरच्या टीमने उचलला पाहिजे, अशीही शिफारस आहे. क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या ‘एमसीसी’च्या जागतिक क्रिकेट समितीची बैठक दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये पार पडली. 

टेस्ट क्रिकेटसंदर्भात उचलणार मोठं पाऊल?

या बैठकीत समितीने एक निवेदन जारी केलं. समितीने जारी केलेल्या निवेदनात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सिरीजमध्ये निर्णायक सामना न झाल्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आलाय. इतकंच नाही तर या बैठकीत वेस्ट इंडिजच्या ऑस्ट्रेलियावरील विजयाचे कौतुक देखील करण्यात आलं. डिसेंबरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची सिरीज देखील अनिर्णित राहिली होती. 

"सध्या खेळल्या जाणाऱ्या रोमांचक टेस्ट क्रिकेट आणि खेळाचे पारंपारिक स्वरूप राखण्याच्या महत्त्वाच्या समर्थनार्थ ही शिफारस केली की, पुरुषांच्या टेस्ट सिरीजमध्ये किमान 3 सामन्यांची सिरीज खेळवण्यात यावी. हा बदल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं पुढील चक्र म्हणजेच 2028 पासून करण्यात यावा, असं समितीने म्हटलंय. 

पाहुण्या टीमचा प्रवास खर्च यजमान टीमने उचलावा

नुकतंच वेस्ट इंडिज क्रिकेटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दावा केला होता की, त्यांच्या टीमचा प्रवास खर्च हा बोर्डाच्या बजेटचा एक भाग आहे. यासंदर्भात निवेदनात असं म्हटलंय की, 'WCC ला याची जाणीव आहे की खेळाची जागतिक अर्थव्यवस्था खोलवर असमतोल आहे, जे दौऱ्याच्या टीमसाठी हानिकारक आहे. त्यामुळे खर्चाची ही असमानता लक्षात घेता भविष्यात यजमान टीम मॅनेजमेंटने पाहुण्या टीमचा खर्च करण्यास सांगावं असं, या समितीने म्हटलंय.

पॅनलमध्ये सौरव गांगुलीचाही समावेश

WCC अध्यक्ष श्रीलंकेचे कुमार संगकारा आहेत, तर इतर सदस्यांमध्ये क्लेअर कॉनर, कुमार धर्मसेना, सौरव गांगुली, झुलन गोस्वामी, हीदर नाइट, जस्टिन लँगर, इऑन मॉर्गन, रमीझ राजा, रिकी स्केरिट आणि ग्रॅम स्मिथ यांचा समावेश आहे.