...असेही मावळे शिवरायांचे! 'दृष्टी नाही पण इच्छाशक्ती' याच जोरावर ‘त्या’ 48 साहसवीरांनी सर केला पुंरदर किल्ला

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगांचे सौंदर्य आणि येथील शिखरे, किल्ले जगभरातील पर्यटकांसह देशातील, महाराष्ट्रातील तरुणांना नेहमीच पर्यटनासाठी, ट्रेकिंगसाठी आकर्षित करीत असतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यांची सफर म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. प्रत्येक ऋतूमध्ये किल्ल्याचे सौंदर्य वेगवेगळे असते. मात्र नेत्रहिनांना त्याचा लाभ घेता येत नाही. 

Diksha Patil | Jan 27, 2025, 16:26 PM IST
1/7

अंध व्यक्तींची ही खंत लक्षात घेऊन मुंबईतील रुईया महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलेली 'नयन फाउंडेशन' ही संस्था गेली 15 वर्षे अंध मुला-मुलींना 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गड-किल्ल्यांची सफर घडवून आणत आहेत. आतापर्यंत या संस्थेच्या मदतीने अंध बांधवांनी रायगड, सिंहगड, राजगड, रायरेश्वर, सज्जनगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेले कळसूबाई सर केले आहे. यंदा त्यांनी 48 अंध बांधवांना पुरंदर किल्ल्याची सफर घडवून आणली आहे. 

2/7

मुंबईतून शनिवारी 25 जानेवारी रोजी या मुलांनी पुरंदर किल्ल्याकडे प्रयाण करत रविवारी सकाळी ही मुले किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचली. दृष्टी नाही पण गाठीला इच्छाशक्ती याच जोरावर ‘त्या’ 48 साहसवीरांनी छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्याची वाट पकडली. 

3/7

पाठीवर बॅग, पायात बूट, डोक्यावर टोपी आणि प्रत्येकाच्या जोडीला मदतीचा एक हात अशा पद्धतीनं ही साखळी तयार करण्यात आली. प्रजासत्ताकदिनानिमित्त तिरंगा ध्वजाला मानवंदना देत या सर्वांनी गड चढायला सुरुवात केली. हे 48 साहसवीर आणि त्यांच्यासाठी तेवढेच मदतीचे हात बरोबर घेत मोहीम सुरू झाली. 

4/7

वाटा-आडवाटांवरील घसरणे-पडणे-सावरणे सुरू झाले. खड्डे, चढउतार यांचा अंदाज घेत पावले टाकली जात होती. बरोबरच्या मदतनिसांकडून प्रत्येक पावलाबाबत मार्गदर्शन केले जात होते. अशी ही दमछाक करणारी, आव्हान वाटणारी दृष्टिहीन गिर्यारोहकांची मोहीम हळूहळू गडाच्या माथ्याच्या दिशेने सरकू लागली. डोळयांसमोर केवळ अंधार आणि आधारासाठी केवळ एक हात यावर या 48 पायांनी केवळ अडीच तासांमध्ये त्यांनी 4470 फूट उंचीच्या दुर्गशिखराच्या माथ्याला स्पर्श केला आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीनं प्रजासत्ताकदिन साजरा केला. 

5/7

हा ध्यास आहे मुंबईतील ‘नयन फाऊंडेशन’च्या दृष्टिहीन युवकांचा आणि त्यांना मदतीचे हात देणाऱ्या ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांचा आणि स्वरुप सेवा संस्थेचा. गडात प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा झाल्या. मग तिथल्या चिऱ्यांना स्पर्श करत, गडाचा इतिहास उलगडू लागला. 

6/7

दिवसभर इतिहास, भूगोल, गिर्यारोहणाच्या या आडवाटेवर भटकंती केल्यावर भारतमातेचा जयजयकार करत या मोहिमेचा शेवट झाला. राष्ट्रगीत झाले आणि एक आगळावेगळा दिवस अनुभवत हे सर्व खरेखुरे साहसवीर गड उतरू लागले. ज्यांच्यासाठी खरेतर दैनंदिन जीवनदेखील एखादे गिर्यारोहण असते अशा या दृष्टिहीन पावलांनी धडधाकट शरीरांना लाजवेल अशी कामगिरी केली होती. 

7/7

गड उतरताना त्यांच्या चेहऱ्यावर याच पराक्रमाचे स्मितहास्य उमटलेले होते. त्यांच्या जिद्दीला आत्मविश्वासाचे बळ प्राप्त झाले होते.समाजातील अंध, मुकबधिर आणि दिव्यांग बांधवाना नेहमी मदत करणे हे प्रत्येक सुजाण नागरीकाचे कर्तव्य आहे.