₹1900 कोटींचा रस्ता बांधला मग ₹8000 कोटींची टोलवसुली का? गडकरी म्हणाले, 'तुम्ही कार..'

Nitin Gadkari Explains Toll Collection Logic: रस्ता बांधण्यासाठी 1900 कोटी लागले तर टोल म्हणून 8000 कोटी का वसुल केले? या प्रश्नाला नितीन गडकरींनी अगदी उदाहरणासहीत काय उत्तर दिलं एकदा पाहाच....

| Sep 18, 2024, 07:46 AM IST
1/8

gadkariontoll

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणात टोल आकारला जात असल्याच्या आक्षेपावर अखेर भाष्य केलं आहे. एका कार्यक्रमामध्ये गडकरींना टोल आकारणीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी थेट या प्रश्नाला उत्तर दिलं.

2/8

gadkariontoll

रस्ता बांधण्यासाठी अवघे 1900 कोटी रुपये खर्च केलेले असताना 8000 कोटी रुपयांची टोल वसुली का केली जाते? असा थेट प्रश्न गडकरींना एका पत्रकाराने विचारला.   

3/8

gadkariontoll

कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला पडणाऱ्या या प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी, टोलच्या माध्यमातून काही दिवसांमध्ये कर वसूल करता येत नाही. इतरही अनेक गोष्टींसाठी पैसा खर्च होतो त्याची काळजी सरकार घेतं. टोल घेण्यापूर्वी आणि टोल घेतल्यानंतरही याचा खर्च सरकारलाच करावा लागतो, असं गडकरींनी सांगितलं.  

4/8

gadkariontoll

गडकरींनी अगदी उदाहरणासहीत हे गणित समजावून सांगितलं. "तुम्ही कार किंवा घर रोख रक्कम देऊन विकत घेतलं तर तुम्हाला अडीच लाख रुपये मोजावे लागतात. तुम्ही तिच गोष्ट 10 वर्षांच्या कर्जावर घेतली तर त्याची किंमत 5.5 लाख ते 6 लाखांपर्यंत जाते. दर महिन्याला तुम्हाला व्याज भरावं लागतं. अनेकदा कामं ही कर्ज काढून केली जातात," असं गडकरी म्हणाले.

5/8

gadkariontoll

दिल्ली-जयपूर हायवेवरील महागड्या टोलबद्दलही गडकरींनी 'न्यूज 18'च्या 'चौपाल' या कार्यक्रमात भाष्य केलं. राष्ट्रीय महामार्ग 8 बद्दल बोलताना गडकरींनी, "हा रस्ता युपीए सरकारने 2009 साली मंजूर केला. 9 बँकांचा या प्रकल्पामध्ये समावेश होता. हा रस्ता बांधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कंत्राटदार पळून गेले. बँकांनी कोर्टात याचिका दाखल केल्या. त्यानंतर नवीन कंत्राटदार आले. आम्ही नवीन कंत्राटं रद्द केली. नवी दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले. आम्ही नवीन डीपीआर जारी केला. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झालं. सहा पदरी रस्ता बांधायचा झाला तर आम्हाला अतिक्रमण हटवावं लागेल हे निश्चित होतं. यंदा पावसामुळे आम्हाला अधिक अडचणींचा सामना करावा लागला," असं सांगितलं.

6/8

gadkariontoll

नुकत्याच एका महिती अधिकार अर्जाला देण्यात आलेल्या उत्तरामध्ये दिल्ली-जयपूर मार्गावर राजस्थानमध्ये असलेल्या मोहनपूर टोल नाक्यावर 8 हजार कोटी रुपयांचा टोल जमा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. या रस्त्याच्या बांधणीसाठी 1900 कोटींचा खर्च झाला आहे.  

7/8

gadkariontoll

यावेळी बोलताना गडकरींनी भारत हा सध्या जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून भारत सध्या या यादीत तिसऱ्या स्थानी जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं.

8/8

gadkariontoll

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या सरकारमधील पहिल्या 100 दिवसांमध्ये 8 रस्ते प्रकल्प केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूर केल्याची माहिती गडकरींनी दिली. या प्रकल्पांचा एकूण खर्च 51 हजार कोटी रुपये इतका असल्याचं गडकरींनी सांगितलं. मार्च महिन्यापर्यंत आमच्या विभागाच्या माध्यमातून 3 लाख कोटींची कामं पूर्ण करण्याचं उद्दीष्ट आहे, असंही गडकरी म्हणाले.