संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण ओतणाऱ्या 'या' शाहिरांना तुम्ही किती ओळखता?
1 मे संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यासाठी 105 हुतात्म्यांनी घरादाराची तमा न बाळगता, मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी रक्ताचे पाट वाहिले.
तृप्ती गायकवाड, झी मीडिया मुंबई: महाराष्ट्राला मुंबई मिळावी आणि स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावं याकरिता या क्रांतिकारकांनी जितकं मोलाचं कार्य केलं तसंच आपल्या काव्यातून आणि कवणातून समाजाला ज्वलंत वास्तव्य दाखवून देणाऱ्या शाहिरांचं ही तितकच मोलाचं योगदान आहे. भारुड, तमाशा, ओवी, पोवाडा, कीर्तन आणि भजन हा महाराष्ट्राची खास ओळख मानली जाते. ही कला जिवंत ठेवणाऱ्या आणि जपणाऱ्या लोककलावंतांनी फक्त मनोरंजनच नाही तर वेळोवेळी समाजप्रबोधनही केलं. आपल्या किर्तनानातून आयुष्याचा मूलमंत्र देणाऱ्या तुकोबांनी त्यांच्या कीर्तनातून छत्रपती शिवरायांच्या सैन्यात भरती होण्याकरिता तरुणांच्या मनात बीजं पेरली.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/734049-kalavant22.jpg)
अण्णा भाऊ साठे
![अण्णा भाऊ साठे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/734047-anna-bhau-2.jpg)
काट्याकुट्याचं आयुष्य जगणाऱ्या अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातून कायमच अन्यायाच्या विरोधातली बंडखोरी आणि संघर्षाची कहाणी व्यक्त होत आली. सांगलीच्या या शाहिराने मुंबईसह बेळगाव,विदर्भ आणि सीमाभागातील अनेक छोटी मोठी गावं महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी राज्यातल्या तळागाळातील लोकांना आपल्या शाहिरी बाण्याने लढण्यासाठी प्रेरित केलं.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/734046-anna-bhau-1.jpg)
डफलीवर थाप मारून "माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतिया काहिली"... हे काव्य विवाहित जोडप्याच्या विरहाप्रमाणेच राजकिय डावपेचांना बळी पडलेल्या प्रत्येकाला बंड पुकारण्यास प्रेरित केलं. अण्णा भाऊंच्या जीवनाचा प्रवास कायमच खडतर होता. ते साहित्यिक असण्याबरोबरच क्रांतिकारी चळवळीचे कार्यकर्ते देखील होते. अण्णा भाऊंच्या धारदार लेखणीने स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी समाजाला एकजुटीने लढण्यास प्रेरणा दिली.
शाहिर साबळे
![शाहिर साबळे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/734045-sable2.jpg)
महाराष्ट्राची लोकधारा या कलाप्रयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे लोककलावंत शाहीर साबळे यांनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन व्हावं यासाठी मोलाचं योगदान दिलं होतं. कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच शाहीर साबळे हे कलेतून केवळ मनोरंजन नाही तर समाज प्रबोधन करण्यास अग्रेसर असत.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/734044-sable1.png)
शाहीर साबळे यांना साने गुरुजींचा सहवास लाभला होता. कळत्या वयात त्यांच्यावर साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव पडल्याने शाहीर बऱ्याच स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. गोवा हैदराबाद मुक्ती संग्राम,1942 मधील 'चले जाव चळवळ' आणि स्वतंत्र महाराष्ट्रात मुंबई शहर विलीन होण्यासाठीच्या चळवळीत त्यांनी समाज प्रबोधन केले होते. 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे 'महाराष्ट्र अभिमान गीत' लिहणारे शाहीर साबळे यांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचं योगदान आहे.
शाहिर अमर शेख
![शाहिर अमर शेख](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/734043-amarsha.jpg)
छत्रपती शिवरायांचा पराक्रम पोवाड्यातून सादर करणारे लोकशाहीर अमर शेख म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं क्रांतिकारी रत्न होतं. अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले अमर शेख यांना जन्मतः परिस्थितीशी संघर्ष करण्याचं बाळकडू मिळालं होतं. त्यांची आई जात्यावर ओवी गात असे उर्दू आणि मराठी मिश्रित ओव्या त्यांच्या आई राचायच्या त्यामुळेच शाहीर शेख यांना लोकसंगीताची आवड निर्माण झाली. गवाणकर, अण्णा भाऊ आणि अमर शेख या तिन्ही शाहिरांनी लोककलेतील त्रिकुट मानलं जातं. या त्रिकुटाने स्वतंत्र महाराष्ट्र राज्यासाठी गावखेड्यात जाऊन लोककलेच्या माध्यमातून क्रांतिकारी चळवळ उभी केली.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/734042-kalavant.jpg)