ज्या ट्रेकवर भेटले त्याच ट्रेकमध्ये बांधली लग्नगाठ

Feb 16, 2019, 16:22 PM IST
1/9

प्रेम... ही एक अशी भावना आहे जी अनपेक्षितपणेच आपल्याला गाठते आणि मग सर्वस्वाने त्या भावनेच्या प्रवाहात आपण वाहत जाते. अशी ही सुरेख भावना ज्यावेळी सहजीवनाच्या अर्थात लग्नाच्या टप्प्यावर पोहोचते तेव्हा साथीदाराविषयीचा आदर आणि नात्यात मागे वळून पाहताना मिळणारं सुखही शब्दांत मांडणं कठिणच. अशीच एक आगळीवेगळी प्रेमकहाणी सध्या सोशल मीडियावर आणि विशेषत: ट्रेकिंगवेड्या मंडळींमध्ये सर्वांचच लक्ष वेधत आहे. (छाया सौजन्य - saumyav10/ इन्स्टाग्राम)

2/9

ही प्रेमकहाणी गाजण्याचं कारण म्हणजे चौकटीबाहेरचा विवाहसोहळा. इथे चौकटीबाहेरचा हा शब्द या विवाहसोहळ्याला अतिशय समर्पक ठरत आहे. कारण, तीन वर्षांपूर्वी पराशर लेक या ट्रेकला भेटलेल्या दोन ट्रेकवेड्यांनी याच वाटेवर पुन्हा येत सहजीवनाच्या शपथा घेतल्या आहेत. (छाया सौजन्य - saumyav10/ इन्स्टाग्राम)

3/9

ही खरीखुरी आणि डोंगररांगांमध्ये खुललेली प्रेमकहाणी आहे सौम्या आणि सारांश यांची. सारांश हा एका स्टार्टअपमध्ये मोबाईल अॅप डेव्हलप करण्याचं काम पाहतो, तर सौम्या एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम पाहते. आता जरा फ्लॅशबॅकमध्ये जाऊया..... तीन वर्षांपूर्वी सौम्याने पराशर लेक या ट्रेकला जाण्यासाठीचा बेत आखला. मित्रांसोबत आखलेल्या या ट्रेकमध्ये अखेरच्या क्षणी एकाला या ट्रेकला जाणं जमलं नाही. बस्स... तिथेच सौम्याच्या गोष्टीमध्ये प्रवेश झाला सारांशचा. (छाया सौजन्य - saumyav10/ इन्स्टाग्राम)

4/9

मित्राच्या जागी सौम्याच्या ग्रुपमध्ये आलेला हा सारांश तसा अनोळखी. पण तरीही तो या सर्वांचा चांगला मित्र झाला. त्यातही या ट्रेकविषयी सांगावं पराशर लेकचा ट्रेकही तसा फारसा आव्हानात्मक नाही. पण, या दोघांच्या प्रेमकहाणीची सुरुवात करणाऱ्या या ट्रेकची भूमिका तशी अतिशय महत्त्वाची. ट्रेकच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्यावर इतरांचा उत्साह मावळलेला असताना आणि थकव्यामुळे शरीरचत उत्तर देत असताना या दोघांच्या आयुष्यात एक नवी पहाट झालेली होती. (छाया सौजन्य - saumyav10/ इन्स्टाग्राम)

5/9

पराशर लेकभोवती फेरफटका मारता मारता त्यांची एकमेकांशी चांगलीच ओळख झाली होती. ही सुरुवात होती एका नव्या आणि अनपेक्षित प्रवासाची. जो प्रवास दिल्लीत, ट्रेकहून परतल्यानंतरही सुरूच होता. ज्यानंतर त्यांनी पुढील प्रवासाचे अनेक बेत आखले. (छाया सौजन्य - saumyav10/ इन्स्टाग्राम)

6/9

सर पास, हम्ता पास, रुपकुंड, खीरगंगा, करेरी लेक आणि गोएचाला असे काही ट्रेक त्या दोघांनी केले. तीन वर्ष डोंगररांगामधून असणाऱ्या वाटा सर करत अखेर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तोही याच डोंगरांगांच्या साथीने. त्यांच्या नजरेत चितकुल, रुपकुंड अशी काही ठिकाणं होती. पण, ज्या ठिकाणहून या प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात झाली होती, त्याच ठिकाणी जाऊन लग्नगाठ बांधण्याच्या पर्यायाला त्यांनी प्राधान्य दिलं. (छाया सौजन्य - saumyav10/ इन्स्टाग्राम)

7/9

8/9

पारंपरिक हिंदू विवाहपद्धतीला थोडा शह देत, हव्या त्याच विधींची त्यांनी निवड केली. नोंदणी पद्धतीने लग्नबंधनात अडकल्यानंतर त्याच दिवशी त्यांनी पराशर लेकच्या दिशने प्रवास सुरु केला. वारे बेभान वाहत होते, त्यात बोचरा गारवा होता. पण,तरीही हे वातावरण त्यांच्या अनोख्या विवाहसोहळ्यासाठी अगदी पूरक होतं. (छाया सौजन्य - saumyav10/ इन्स्टाग्राम)

9/9

सारांश आणि सौम्याच्या लग्नसोहळ्यासाठी जवळपास १५ पाहुण्यांचीच उपस्थिती होती. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र होते. डोंगररांगा, कडेकपारी आणि आव्हानात्मक वाटांमध्ये खुललेली ही प्रेमकहाणी याच डोंगरांच्या, पर्वतांच्या साक्षीने खऱ्या अर्थाने खास ठरली.  (छाया सौजन्य - saumyav10/ इन्स्टाग्राम)