'त्यावेळी महाराज 20 वर्षांचे होते, त्यांनी..'; 'छावा'मधल्या वादग्रस्त लेझिम नृत्यावर उतेकरांचं स्पष्टीकरण

Laxman Utekar Chhaava Movie Controversy On Lazim Dance: छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवल्याच्या मुद्द्यावरुन वाद पेटलेला असतानाच मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी हा डान्स चित्रपटामध्ये का ठेवला याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Jan 27, 2025, 14:29 PM IST
1/13

chaavalaxmanutekar

लक्ष्मण उतेकरांसारख्या संवेदनशील आणि जाणकार मराठमोळ्या दिग्दर्शकाने 'छावा'मध्ये 'तो' वादग्रस्त डान्स का घेतला? असा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाला पडलेला आहे. अशातच स्वत: लक्ष्मण उतेकरांनी या प्रश्नाचं उत्तर देताना या डान्समागील तर्क समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

2/13

chaavalaxmanutekar

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 'छावा' चित्रपटामधील गाण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंधाना येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार असल्याने या चित्रपटाची जितकी चर्चा आहे तितकाच आक्षेप छत्रपती संभाजी महाराज नाचताना दाखवण्यात आल्याने निर्माण झाला आहे.  

3/13

chaavalaxmanutekar

छावा चित्रपटातील डान्सवरुन झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे मराठमोळे दिर्गदर्शक लक्ष्मण उतेकरांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना लक्ष्मण उतेकरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वादग्रस्त डान्सचं दृष्यं मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच त्यांनी हा वादग्रस्त डान्स चित्रपटात का घेण्यात आला होता याबद्दलही भाष्य केलं आहे.   

4/13

chaavalaxmanutekar

...म्हणून राज ठाकरेंना भेटलो - राज ठाकरेंना 'शिवतिर्थ' या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर लक्ष्मण उतेकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरेंची भेट का घेतली? या प्रश्नावर लक्ष्मण उतेकरांनी, "राज ठाकरेंचं वाचन दांडगं आहे. त्यांचं इतिहासाचं ज्ञान चांगलं आहे. त्यांचं महाराजांसंदर्भात वाचन आहे. त्यामुळे सिनेमात नेमके काय बदल करायला हवेत हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. या चर्चेनंत त्यांनी मला काही सूचना केल्या आहेत. त्या अगदी चांगल्या सूचना आहे. त्यांनी छान मार्गदर्शन दिलं आहे. त्यासाठी राज ठाकरेंचं धन्यवाद," असं प्रसारमाध्यमांना उत्तर देताना म्हटलं.   

5/13

chaavalaxmanutekar

राज ठाकरेंचा सल्ला ऐकणार - ज्या डान्सवरुन वाद झाला आहे त्यावरूनही लक्ष्मण उतेकरांना प्रश्न विचारण्यात आला. 'छावा' चित्रपटामधील छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळतानाची दृष्यं डिलिट करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर लक्ष्मण उतेकरांनी राज ठाकरेंनी हाच सल्ला दिल्याचं म्हटलं आहे. "लेझिम खेळतानाची दृष्यं आम्ही डिलिट करणार आहोत. राज ठाकरेंनी हाच सल्ला दिला," असं लक्ष्मण उतेकर म्हणाले.   

6/13

chaavalaxmanutekar

...तर डान्स वगळू - "कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. त्या डान्समुळे कोणाच्या भावना दुखावत असतील, कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचत नसतील तर आम्ही ते (डान्सचं दृष्यं) वगळू. कारण तो चित्रपटाचा मोठा भाग नाही. तो आम्ही नक्कीच डिलिट करु," असा शब्द लक्ष्मण उतेकरांनी दिला. 

7/13

chaavalaxmanutekar

छत्रपतींच्या वारसांनी घेतलेल्या आक्षेपावरही बोलले उतेकर - राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उतकेरांना 'छावा'च्या ट्रेलरवर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपतींचे वासर असलेल्या उदयनराजेंनी आक्षेप घेतल्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उतेकरांनी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. "हिंदीत छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट येतोय. जगाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळणार आहे.  छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजेंचं म्हणणं आहे की काही इतिहासकारांबरोबर आपण चर्चा करायला हवी किंवा स्क्रीनिंग ठेवायला हवं," असं म्हणत पत्रकाराने प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना उतेकरांनी, "आम्ही चर्चा करणार आहोत आणि स्पेशल स्क्रिनिंगही ठेवणार आहोत," असं सांगितलं.  

8/13

chaavalaxmanutekar

चित्रपटाचा उद्देशही सांगितला - पुढे बोलताना उतेकरांनी, "हा चित्रपट बनवण्याचा मागचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे, अशी माझी कळकळीची विनंती आहे. मागील चार वर्षांपासून संपूर्ण टीम या चित्रपटावर काम आणि रिसर्च करत आहे. एवढा मोठा सिनेमा बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण जगाला कळू दे. ते किती मोठे राजे होते. ते किती मोठे योद्धे होते हे जगाला कळायला हवे. पण (ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या लेझिम डान्ससारख्या) एक दोन गोष्टी त्याला असं गालबोट लावत असतील तर त्या डिलिट करायला आम्हाला काही हरकत नाही," असंही म्हटलं आहे.

9/13

chaavalaxmanutekar

स्पेशल स्क्रिनिंगची घोषणा - छत्रपती संभाजीराजेंसाठी 'छावा'चे निर्माते असलेल्या मॅडॉक कंपनीकडून पडताळणीसाठी विशेष शोचे आयोजन करण्यात आलं आहे. 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरवरुन उठलेल्या वादंगामुळे चित्रपट निर्मात्यांनी युवराज संभाजीराजे छत्रपती व इतिहास अभ्यासकांसाठी खास शोचे आयोजन केले आहे. 29 जानेवारी रोजी मुंबईमध्ये या खास शोचे आयोजन करण्यात आले आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.  

10/13

chaavalaxmanutekar

हे दृष्यं का घेतलं? - छत्रपती शिवाजी महाराजांवर, छत्रपती संभाजी महाराजांवर यापूर्वी अनेक चित्रपट आले. पण त्यामध्ये कधीच अशी दृष्यं नव्हती, असं म्हणत उतेकरांना या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज नाचतानाची दृष्यं घेण्यामागील उद्देश काय असं विचारण्यात आलं. या प्रश्नावर उतेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली.  

11/13

chaavalaxmanutekar

चित्रपटाचा आधार काय? - "शिवाजी सामंताची 'छावा' कादंबरी आहे. त्यावर आधारित हा चित्रपट आहे. इतिहासाला खूप वेगवेगळे पदर आहेत. त्यामुळे नेमका हात कुठे घालायचा? म्हणून आम्ही चावा कादंबरीचे हक्क विकत घेऊन त्या कादंबरीवर हा सिनेमा बनवला आहे," असं उतेक म्हणाले.  

12/13

chaavalaxmanutekar

असं काहीही नाही की... - "'छावा'मध्ये लिहिलं आहे की छत्रपती संभाजी महाराज होळीचा उत्सव साजरा करायचे. होळीमधून तो नारळ खेचून घ्यायचे. त्यामुळे लेझिम आपला एक पारंपारिक खेळ आहे. त्यामध्ये आताचे काही स्टेप आहेत असं नाही किंवा काही महाराज असं काही करत नाहीत की जेणेकरुन आपल्याला लाज वाटावी," असंही आपली भूमिका स्पष्ट करताना उतेकरांनी म्हटलं.  

13/13

chaavalaxmanutekar

...म्हणून चित्रपटात तो डान्स - "लेझिम आपला पारंपारिक खेळ आहे. पिक्चर बनवताना हा विचार केला गेला. महाराज लेझिम का खेळले नसतील? असा प्रश्न उभा राहतो. ते त्यावेळेस 20 वर्षाचे होते. महाराजांनी बुरहानपुर  हल्ला केला. जेव्हा ते बुरहानपुर जिंकून रायगडावर आले तेव्हा ते खेळलेही असतील (लेझिम). मात्र जर याने लोकांच्या, शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील तर लेझिम हा प्रकार चित्रपटापेक्षा, महाराजांपेक्षा मोठा नाहीये. तो आम्ही नक्की डिलिट करु," असं उतेकरांनी हा डान्स चित्रपटात का घेण्यात आलेला याबद्दल बोलताना सांगितलं.