नाशिक जिल्ह्यात मुसळधार! गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ तर, नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग

Nashik Rain | राज्यभर पावसाने चांगला जोर धरला असून, नाशिक जिल्ह्यातही पावसाने गेल्या 2 दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगला पाऊस होत असून त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

Updated: Jul 12, 2022, 07:40 AM IST
नाशिक जिल्ह्यात मुसळधार! गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ तर, नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग  title=

नाशिक : राज्यभर पावसाने चांगला जोर धरला असून, नाशिक जिल्ह्यातही पावसाने गेल्या 2 दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगला पाऊस होत असून त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

नांदूरमधमेश्वर धरणातून 72 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सूरू झालाय. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी भागात संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीये, त्यामुळे नांदूरमधमेश्वर धरणातून 72 हजार क्युसेक पाणी मराठवाड्याकरता गोदावरी नदीतून सोडलंय. त्यामुळे मराठवाड्याला नक्कीच याचा फायदा होणार आहे.

निफाड
गेल्या पाच दिवसांपासून निफाड तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय, शेती पुर्णपणे पाण्याखाली गेलीये. कांदा, मूग, भुईमूग, बाजरी, गिलके इत्यादी पिके पाण्यामध्ये बुडाल्यानं सडून जाण्याची भीती आहे,  त्यात नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्यानं शेतातलं पाणी बाहेर कसं काढावं अशी चिंता शेतक-याला सतावतेय.

सुरगाणा
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नार नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहतेय. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याला जोडणारा बाऱ्हे - धरमपूर महामार्गावरील राक्षसभुवन पुल पाण्याखाली गेलाय. परिणामी दोन्ही राज्यांमधळी वाहतूक ठप्प झालीय. दरम्यान, प्रशासनाच्यावतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

सप्तश्रृंग गड
मुसळधार पावसामुळे नाशिकच्या सप्तशृंग गडावर मुसळधार पाऊस बरसत असून पाण्याच्या प्रवाहाने दगड, माती वाहुन आल्यानं मंदिरातुन खाली उतरणारे 6 भाविक जखमी झाले. गडावरील स्थानिकांनी जखमींना देवी संस्थानच्या दवाखान्यात दाखल केलं. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देवी मंदिर ट्रस्टनं केलंय.