www.24taas.com, संदीप साखरे, मुंबई
सचिन तेंडुलकर नावाचं वादळ आज मैदानावर शांत झालं. सचिन आऊट झाला आणि आख्खं वानखेडे स्तब्ध झालं. मुंबई क्षणभरासाठी थबकली आणि प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या आणि सर्वसामान्याच्या मनात गलबललं. लोकलमध्ये, ऑफिसात, टीव्हीच्या दुकानांबाहेर गर्दी करुन मॅच बघणाऱ्या, मोबाईलवर स्कोअर जाणून घेणाऱ्या, टॅक्सीत एफएमवर रेडिओवर स्कोअर ऐकणाऱ्याच्या प्रत्येकाच्या मनात चर्र झालं.. काहींच्या प्रतिक्रियेतून ते आलं, तर काहींचे डोळे पाणावले.. त्या धूसर दृष्टीतून मैदानातून बाहेर पडणाऱ्या सचिनला निरोप देताना प्रत्येकाच्या जीवावर येत होते... मैदानातून पॅव्हेलियनकडे परतणारा हा आपला सचिन पुन्हा मैदानावर दिसणार नाही.. सच्चिन... सच्चिन हे स्वर उच्चरवात परत कानी येणार नाहीत. याची खंत प्रत्येकाच्या मनात डाचत होती.
गेली २४वर्षे या पठ्ठ्यानं विक्रमांचे महामेरु रचले आणि एव्हरेस्टच्या तुलनेची कागगिरी क्रिकेटविश्वात करुन दाखवली. त्यामुळंच ‘गॉड ऑफ क्रिकेट’ ही उपाधी त्याला जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांनी, क्रिकेटपटूंनी आणि क्रिकेट समिक्षकांनीही दिली. साहेबाचा खेळ अशी ओळख असलेल्या क्रिकेट जगतात एका मराठमोळ्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलानं एव्हरेस्ट शिखर करावा ही तशी साधी बाब नव्हती.. हे झालं त्याच्या मोठेपणाविषयी.. महाराष्ट्रात राहणाऱ्या तुम्हा आम्हा सारख्या मुंबईकरांपासून ते खेड्यापाड्यांपर्यंत राहणाऱ्या सामान्य माणसाला सचिननं दिलं तेही सह्याद्रीच्या तोडीचं...
माझ्याबद्दल सांगायचं तर, आजूबाजूला सगळी नाती विरत असताना किंवा त्यातलं फोलपण जाणवत असताना, सचिन आणि माझं नात मात्र गेल्या २४ वर्षांपासून तेच राहिलं.. त्यानं मला एकट्याला पुरुन उरतील असे असंख्य आनंदाचे क्षण दिले आहेत.. आपल्या नेहमीच्या कामाच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या रगाड्यात सगळीकडे अपयश आणि संघर्ष पदरात पडत असताना, सचिननं आम्हा-तुम्हाला विजयाचे चौकार षटकार पाहण्याची संधी तर दिलीच पण ती विजयाची उर्मी माझी आहे, हे अनुभवण्याची संधीही दिली. प्रत्येकाशी त्याचं असं आनंदाचं एक नातं आहे... अगदी माझ्या शालेय जीवनापासून ते आत्ता वयाच्या पस्तिशीपर्यंत या सवंगड्यानं माझ्यावर असा अनेक आनंदक्षणांचा वर्षाव केला आहे.. कित्येकदा शाळा बुडवून, परीक्षेच्या काळात अभ्यास सोडून, कित्येकदा रात्री-अपरात्री सख्या-सोबत्यांसह कुणाच्या तरी घरी जागून, आई-वडिलांच्या आणि गुरुजनांच्या शिव्या खावून सचिनच्या बॅटिंगचा अनुभव टीव्हीवर याची देही याची डोळा अनुभवण्याची संधी त्यानं आम्हाला दिलीय. त्याच्या प्रत्येक चौकार-षटकारातून एक जगण्याचा आत्मविश्वासच संस्कार म्हणून त्यानं माझ्याच नव्हे तर अनेकांच्या पदरात टाकलाय.. आणि हेच आमचं वैभव आहे आणि भाग्य ही...
अनेकदा वाटतं की महाराष्ट्रात जन्माला येणं हे तुमचं-माझं पूर्वजन्मीचं पुण्य आहे.. नाहीतर ज्ञानबा-तुकाराम ते छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य ते यशवंतराव आणि पु. ल. ते आमटे, बंग परिवार अशा असंख्य कर्मयोग्यांना आम्ही नीटसे जाणूनच घेऊ शकलो नसतो. त्यांच्या कर्माचा, कार्याचा, त्यांच्या साहित्याचा आणि विचारांचा एक मोठा संस्कार तुम्हा-आम्हा सर्वांवर आहे.. आणि या संस्कारात निश्चितच सचिन तेंडुलकर या नावाचाही मोठा वाटा आहे.
विशेषत: आजच्या जागतिकीकरणाच्या काळात साता समुद्राच्या अटकेपार झेंडा मिरवणाऱ्या अनेक महाराष्ट्रातील तरुणांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोरही सचिन तेंडुलकरने एक नवा आदर्शच निर्माण केला. जागतिकीकरणाच्या लाटेत एका बॅटच्या आणि अतुलनीय जिद्दीच्या जोरावर एका मराठी साहित्यिकाच्या घरातला एक मुलगा कित्ती उत्तुंग यश मिळवू शकतो, याचं सचिन हे एक उंच उदाहरण आहे.
नुसतंच साधं यश मिळवल्यानंतर, अनेकांच्या डोक्यात राख जाते.. ते यश टिकवून ठेवण्याची धडपड करण्यापेक्षा त्यांचे आब आणि रुबाबच मोठे होताना दिसतात. मात्र सचिनने २४ वर्षे यश टिकवून ठेवण्यासाठी केलेले अपरिमित कष्ट आणि एवढ्या यशाच्या डोंगरावरही त्यानं राखलेली नम्रता.. ही नेहमीच अत्यंत थक्क करायला लावणारी बाब आहे.. सचिन किती सह्रदयी आहे, याची असंख्य उदाहरणे आणि प्रसिद्धीपासून जाणीवपूर्वक दूर राहून त्यानं केलेली सामाजिक कार्य, या सगळ्यानं तुमच्या आमच्यासमोर मोठ्ठ्या माणसानं काय वागायला हवं, याची एक चांगल्या अर्थी लक्ष्मणरेषा त्यानं आखून दिली.
डोळे मिटून क्रिकेट म्हटलं किंवा झोपेतून उठून कुणी क्रिकेटबाबत विचारलं तरी आपल्याला आठवतो, तो सचिन.. त्याच्या मैदानावर वावरण्याच्या अनेक लकबींसह तो आपल्या डोळ्यासमोर तंतोतंत उभा राहतो.