www.24taas.com, संदीप साखरे, झी मीडिया
हेच वाक्य परवा किमान ५० वेळा तरी माझ्या तोंडातून निघालं.. प्रत्येक दोन-दोन पावलांवर अंगावर काटा उभा राहील अशी परिस्थिती.. मागून ढकलत ढकलत आपल्याला पुढे ओढणारी दोन निर्लज्ज मंडळी.. नुसतं खाली बसलो तरी ‘खाली बसलास’ असं जोरजोरात कंठशोष करणारा एक खवीस.. खाली बसलो म्हणजे मी एखाद्याचा खून केला अशी भावना माझ्याच काय पण माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांच्या मनात निर्माण करणारा त्याचा आवाजातला सूर.. वाटेत मिळेल तिथे बसण्याची किंवा झोपण्याची इच्छा.. आता यापुढे एक पाऊलही टाकू नये अशी परिस्थिती आणि सारखं ‘चल संदीप..चल संदीप’ असा घोशा लावणारी दोन बोगस मंडळी... विशेष म्हणजे या दृष्टचक्रात मीच स्वत:ला अडकवून घेतलं असल्यानं माझा माझ्यावरच होणारा संताप हा यातला तिसरा भाग .. एवढ्या हाल अपेष्टा आणि तुम्हाला मुळातूनच भानावर आणणाऱ्या या दृष्टचक्राचं सुमधूर नाव एन्ड्युरो...
सुमारे १४ वर्षांपूर्वी असणारे आपण आणि आजचे आपण किती फरक पडलाय, याचं एक भयंकर वास्तव आपल्या नजरेसमोर आणणारं, म्हणजे एखाद्या सिनेमात ‘याददाश’ वापस आल्यासारखा सीन किंवा एखाद्या चिरकुट मालिकेतला ठिश ठिश असा विविध अंगल्सनी दाखवणारा आणि तुम्हाला जमिनीवर आणणारा सीन.. (हा हा.. )
१९९७ ते २००० या काळात केलेले ट्रेक आणि त्यानंतर नोकरीच्या रगाड्यात अडकल्यानंतर, सुमारे १४ वर्षांनी त्या अनुभवाच्या बळावर एन्डयुरोसाठी धरलेला आग्रह.. सगळचं चुकत गेलं.. (हा हा..) रात्री अपरात्रीच्या प्रवासानंतर पुण्यातल्या कटारिया हायस्कूलमध्ये पोहचल्यावर सकाळचा एन्ड्युरोचा तो माहौल.. रंगीबेरंगी, जल्लोषाचं वातावरण, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशातून एवढचं नाही तर परदेशातून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी, किंवा पुन्हा पारखण्यासाठी किंवा ट्रेकिंग, सायकलिंगवर असणाऱ्या प्रेमापोटी पोहचलेली शेकडो मंडळी.. कुणी ओपनमध्ये, कुणी अम्युच्युअर, कुणी कॉर्पोरेटमध्ये, कुणी डॉक्टर, तर कुणी ज्युनिअरमध्ये आणि या ज्युनियरच्या जोडीला मीडिया ग्रुप.. ज्यात आमची टीम सहभागी झालेली.. झी २४ तास, मुंबई रॉक्स...
फ्लॅग होस्टिंग, त्यानंतर सुरु केलेलं सायकलिंग, कित्येक वर्षांनंतर हातात आलेली सायकल आणि त्यामुळे आपण किती अवघड जागी फसलेलो आहोत याची पहिल्या तीनच मिनिटांत झालेला साक्षात्कार.. त्यात भर म्हणून की काय आमच्या तीन जणांच्या ग्रुपमधला दुसरा एक खवीस माझ्यासह रस्ता चुकला.. तेही पुण्यात.. म्हणजे तो चुकला की मी चुकवला हा भाग अलहिदा.. पण खापर त्याच्याच डोक्यावर.. त्यामुळे उगाचच सायकलचा जरा जादाच फेरा पडला.. आणि मग सारसबागेशी पोहोचून, सायकली टेम्पोत आणि आम्ही बसमध्ये असा आमचा प्रवास सुरु झाला तो सिंहगडाकडे, म्हणजे खऱ्या छळाकडे....
तीन जणांचा एक गट, त्यांच्या सायकलींसह डोंगरदऱ्यांतून पार पाडावी लागणारी ही स्पर्धा.. विशेष म्हणजे अगदी स्टार्टिंग पॉईंट ते एन्ड पॉईंटपर्यंत तिघांनी सोबतच गेलं पाहिजे सायकलसह हा बेसिक नियम.. त्यामुळे मी पुढे, तु पुढे असा ऑप्शनच नाही.. त्यात आम्ही मीडियावाले म्हणजे लिंबू टिंबू त्यामुळे आपलं साधं १२ किलोमीटरचं सायकलींग, आणि सिंहगड चढून आणि गडावर पार सगळीकडे फिरवून परत उतरण्याचं एक छोटं आव्हान ( म्हणजे त्यांच्यासाठी) हे आमच्यासाठी.. तर दुसऱ्या ग्रुपसमोर आव्हानं काय तर ७५ किलोमीटर सायकलींग, २५ किलोमीटर ट्रेकिंग, त्यानंतर रिव्हर क्रॉसिंग, रायफल शूटिंग आणि मग त्यानंतर एन्ड पॉईंटला पोहोचायचं.. हे थोडं फार वरखाली.. त्यात जेवायला वेळचं नाही, झोपायचं नाही, काही नाही.. चालत रहायचं किंवा सायकलिंग करायचं.. बा बा बा.. हे लिहिताना पण मला दम लागतोय.. पण या सगळ्या मंडळींनी जवळपास ३६ तास कसे काढलेत हे मी अगदी जवळून पाहिलंय आणि हबकलोही आहे.. आणि एसीत दररोज फिरणारे पाय पार जमिनीवर आलेत..
थोडी गम्मत...
गेल्या वेळेपेक्षा मीडियासाठी स्पर्धा थोडी सोप्पी केली आहे, असं सगळेजण सांगत होते.. आम्ही म्हणजे आदरार्थी बहुवचन, हा आपले कधी एकदा स्पर्धा सुरु होते याची वाट पाहतोय.. स्वतःवर खूप दांडगा विश्वास.. हे काय आपण यू करु अशी आत्मस्तुतीची भावना.. आणि स्पर्धा सुरु झाली आणि पहिल्याचं टर्ननंतर रस्ताच नसलेल्या भागात आमचं सायकलिंग सुरु... एखाद दोन किलोमीटर दुपारच्या उन्हात आधी स्वतःचं आणि नंतर सायकलचं काय करायचं, आणि हे संपणार कधी हा पडलेला पहिला प्रश्न.. हे वाटतं तितकं सोप्पं नाही, हे जाणवायला सुरुवात.. त्यात दोन किलोमीटर पुढे जाऊन परतणारे स्पर्धक म्हणजे आता परतायचं ही भावना..पण नंतर कळलं की रस्ता चुकलाय..सगळ्