अटलबिहारी आणि मी....

आज अटलबिहारी वाजपेयींचा वाढदिवस. त्यांची काही भाषणे ऐकण्याची संधी मिळाली. लहानपणी बुलडाण्याला टिळक मंदिराच्या मैदानावर त्यांचे भाषण ऐकले होते..धोतर नेसलेले अटलबिहारी ओघवत्या शैलीत बोलतांना अजुनही आठवतात.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 27, 2013, 11:55 PM IST

प्रकाश दांडगे
आज अटलबिहारी वाजपेयींचा वाढदिवस. त्यांची काही भाषणे ऐकण्याची संधी मिळाली. लहानपणी बुलडाण्याला टिळक मंदिराच्या मैदानावर त्यांचे भाषण ऐकले होते..धोतर नेसलेले अटलबिहारी ओघवत्या शैलीत बोलतांना अजुनही आठवतात. मग पुण्यात असतांना त्यांची काही भाषणे कव्हर केली. तेव्हा कारगिल युध्द सुरु होते. हे युद्ध आपण जिंकू असा विश्वास ते भाषणात व्यक्त करत. एकदा ते सुरेश कलमाडींच्या प्रचारासाठीही आले होते !!
वाजपेयींना जवळून भेटण्याची संधी दोनदा मिळाली. पहिली भेट झाली तो दिवस होता 31 जुलै 1994. पुण्यात पुनम हॉटेलमध्ये अटलबिहारी वाजपेयींची पत्रकार परिषद होती. तेव्हा भाजप सत्तेत यायचा होता. वाजपेयी पंतप्रधान व्हायचे होते. त्यामुळे वाजपेयींभोवती फारशी गर्दी नव्हती. मला वाजपेयींची सही घ्यायची होती. माझ्याजवळ राम मनोहर लोहियांचे Interval During Politics हे पुस्तक होते. त्याचेच पहिले पान उघडले आणि वाजपेयींना सही करण्याची विनंती केली. त्यांनी लोहियांचे नाव वाचले. मंद स्मित केले आणि सही केली... तेच हे पान! ! अजुनही हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.
अटलबिहारी वाजपेयी पुढे पंतप्रधान झाले. पुण्यातील राजभवनात त्यांनी पंतप्रधान असतांना पत्रकार परिषद घेतली. तिला मी हजर होतो. सत्तेत नसलेल्या आणि सत्तेत असलेल्या वाजपेयींच्या देहबोलीत काहीच फरक पडला नव्हता...तेच मंद स्मित चेह-यावर कायम होतं...त्याच सहजपणे ते बोलत होते...मला वाटतं वाजपेयींच्या या स्मितातच काहीतरी आश्वासक होतं...त्यामुळेच संघ आणि भाजपच्या विचारसरणीला विरोध करणारेही वाजपेयींचे चाहते होते...कविता करणारे पुण्यात आल्यावर भीमसेन जोशींची मैफल राजभवनात आयोजित करणारे वाजपेयी हिंदुत्वाची जोरदार पाठराखण करतांना मात्र आक्रमक वाटायचे...जणू दोन वेगळी व्यक्तिमत्वे....

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.