नाशिक : तुमची बाईक आता चोरीला जाणारच नाही. दुसरी चावी लावली तर ताबडतोब मेसेज येईल. चोरी झालीच तर बाईक बंद पडेल. चोरी होतांना अर्लट मिळेल आणि यातूनही चोर यशस्वी ठरलाच तर तुमच्या गाडीचे लोकेशनही ट्रेस होवू शकेल. हा शोध लावलाय येवल्याच्या काही विद्यार्थ्यांनी.
तुमची बाईक चोरी होऊ नये असं तुम्हाला वाटतंय? तर मग येवल्यातल्या या विद्यार्थ्यांचा प्रयोग तुम्ही पाहायलाच हवा. धानोराच्या मातोश्री इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या या विद्यार्थ्यांनी बाईक चोरी होऊ नये म्हणून आगळावेगळा प्रोजेक्ट साकारलाय. या सिस्टीममुळे चोरी होत असताना आपण अलर्ट होऊ शकतो.
गाडीला अनोळखी व्यक्तीनं हात लावल्यास सिस्टीम मेसेज पाठवते. चुकीची चावी गाडीला लावल्यास मेसेज किंवा कॉल करते. बाईक चोरी झालीच तर मेसेजद्वारे इंजिन बंद करता येतं. तसंच चोरी झालेल्या बाईकचं अचूक ठिकाणही शोधता येतं.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या सिस्टीममुळे पोलीस यंत्रणेला मोठा फायदा होणार आहे. तुम्हालाही तुमची बाईक चोरी जाण्यापासून वाचवायची असल्यास या सिस्टीमचा वापर करायला काही हरकत नाही.