नवी दिल्ली : झिका विषाणूमुळे भारतातील प्रसिद्ध मोटार कंपनी टाटाने आपल्या गाडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलाय. सध्या जगभरात झिका विषाणूच्या संसर्गामुळे भितीचं वातावरण निर्माण झालंय. जागतिक आरोग्य संघटनेनेही याविषयी अनेक इशारे दिले आहेत आणि जागतिक आणीबाणी जाहीर करण्यात आलीये.
आता तुम्ही म्हणाल झिका आणि गाडीचे नाव बदलण्याचा संबंध काय. झिका या नावामुळे कंपनीने गाडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलाय. त्याचं झालं असं की टाटा समूहाने
ही गाडी आज म्हणजे ३ फेब्रुवारीला दिल्लीत भरणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये लाँच करण्याचा निर्णय घेतला. या गाडीच्या प्रसिद्धीसाठी खूप तयारी झाली. गाडीची भरपूर जाहिरातही झाली.
'झिप्पी कार' संबोधल्या जाणाऱ्या गाडीचं नाव छोटं असावं म्हणून 'झिका' असं ठेवलं गेलं होतं. पण, अशा काळात आपल्या गाडीचं नाव याच विषाणूच्या नावासारखं असावं, असं कोणत्याही कंपनीला वाटणार नाही. म्हणूनच टाटा समूहानेसुद्धा आपल्या नव्या गाडीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतलाय.
नव्या नावासंबंधी अजूनपर्यंत तरी काही निर्णय झाला नाहीये. पण, तरी आज दिल्लीत होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये तरी ही गाडी 'झिका' याच नावाने लाँच केली जाणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार 'जगभरात 'झिका' विषाणूमुळे त्रास झालेल्या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. म्हणूनच एक जबाबदार कंपनी या नात्याने आम्ही आमच्या गाडीचं नाव बदलत आहोत.' ही गाडी सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. या गाडीची साधारण किंमत साडेचार लाखाच्या आसपास असेल.