मुंबई : हे मेथ ५० ते १०० रुपयांना पावडर वा गोळीच्या स्वरूपात मिळते. वेसावे, सात बंगला, जुहू चौपाटय़ांवर सकाळच्या वेळी घोळक्याने फिरणारे महाविद्यालयीन युवक पूर्वी फॅशन म्हणून सिगारेट ओढायचे. आता त्याची जागा आईस, म्याव म्यावने घेतली आहे.
कोकेन, हेरॉईनसारखे महागडे अमली पदार्थ परवडत नाहीत. गांजाचा प्रभाव बराच काळ राहतो. त्याची दरुगधीही येते. मेथचे तसे नाही. शिवाय ते स्वस्तही आहे. सहजही मिळते. एका तरुणाने सांगितले, शालेय पातळीवरच बीअर, व्हिस्कीची नशा चाखलेल्या मुलांना या मेथने जरा हटके नशा दिली आहे.
अमली पदार्थ प्रतिबंधक विभागातील अधिकारी सांगतात, गेल्या वर्षभरात मेथ घेणाऱ्या तरुणांचे प्रमाण ८० टक्क्यांच्या घरात पोहोचले आहे. स्थानिक पोलीसही या दलालांना रोखण्यासाठी काहीच करीत नाहीत. पण केवळ हप्तेबाजीच्या जोरावर हे सारे सुरू आहे असेही नाही.
कुठल्या पातळीवर हे व्यसन फैलावले आहे याचा मुळी अंदाजच स्थानिक पोलिसांना नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळे आता साऱ्याच महाविद्यालयांबाहेर, काही पब्स, डिस्को थेक, काही प्रमाणात मॉल्सच्या परिसरात, थोडक्यात जेथे जेथे तरुण जातात तेथे तेथे मेथने आपला विळखा घट्ट केला आहे.
नक्की काय आहे मेथ?
मेथ म्हणजे मेथअॅम्फिटामाईन. मेथचे आणखी प्रचलित नाव म्हणजे आईस क्युब्स. खडीसाखर वाटावी असे. पाण्यात वा मद्यात सहज विरघळणारे. गोळीच्या स्वरूपात वा सिगारेटमध्ये घालूनही ते ओढले जाते. मेथचा आणखी एक अवतार म्याव म्याव. म्हणजेच मेफ्रेडॉन - एमडी. नारकोटिक्स ड्रग अॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टॅन्स म्हणजेच एनडीपीएस कायद्यात शेडय़ुल दोनमध्ये ते समाविष्ट होते. त्यामुळे ते बाळगणे कायदेशीर आहे.
मेथचा वापर कच्चा माल म्हणून खतनिर्मिती, तसेच औषधनिर्मिती कारखान्यांत केला जातो. सध्या त्याचा वेगळाच पण भयानक वापर सुरू आहे. हाय सोसायटीलाही कोकेन परवडेनासे झाले आहे. कोकेनमध्ये भेसळ असल्याचीही चर्चा आहे. कोकेनप्रमाणेच मेथचा प्रभाव असल्यामूळे या वर्गात ते जास्त लोकप्रिय झाले.
काही अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही उच्चभ्रूंच्या कथित शाळांपर्यंतही मेथ पोहोचले आहे. या ठिकाणी दलालांच्या नव्हे तर हाय सोसायटीतुनच त्याचा शिरकाव झाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.