नागपूर : फेसबुकच्या नादी लागलेल्या एका मुलीने आपल्या प्रियकरासोबत अपहरणाचे नाट्य रचल्याची घटना ताजी असतानाच, सोशल मीडियाचा गैरवापर करण्याचा आणखी एक प्रकार नागपुरात उघडकीस आलाय.
२२ वर्षीय विजय फुलवानी जो एका तरुणीच्या प्रेमात आकांत बुडाला होता. मात्र ती तरुणी त्याला प्रतिसाद देत नव्हती. एकतर्फी प्रेमात बुडालेल्या विजयनं तिचं प्रेम मिळवण्यासाठी मग फेसबुकचा आधार घेतला. त्यानं त्या तरुणीचं फेक फेसबुक अकाउंट तयार केलं. त्यावर त्या तरुणीचा फोटो आणि मोबाईल नंबरही टाकला.
यावर कहर म्हणजे त्यानं या तरुणीची ओळख कॉलगर्ल अशी टाकली. हा तपशील पाहून अनेकांनी या तरुणीला फोन करण्यास सुरुवात केली. एका मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ही तरुणी अशा फोन कॉल्समुळं हादरुन गेली. याबाबत तिनं नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार केली.
तरुणीला येणाऱ्या फोन कॉल्सची माहिती घेऊन पोलिसांनी या विजयला अटक केली आणि एक धक्कादायक बाब समोर आली. हा तरुण दुसरा तिसरा कुणी नसून याच तरुणीच्या मैत्रिणीचा धाकटा भाऊ होता. मात्र याची पुसटशी कल्पनाही त्या तरुणीला नव्हती.
सोशल मीडियामुळं अनेक नाती आणि व्यक्ती एकमेंकांशी जोडली जातायत. मात्र काही वेळा हीच नाती जोडण्यासाठी सोशल मीडियाचाच गैरवापरही होत असल्याचं या घटनेतून समोर आलंय.