बीडीडी चाळी हेरिटेज नाहीत, राज्य शासनाचंही मत!

‘९० वर्षांपेक्षा जुन्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास ही राज्यशासनाची जबाबदारी आहे. पण, बीडीडी चाळी हेरिटेजमधून वगळण्याचा निर्णय अगोदर महापालिकेनं घ्यावा, राज्य शासन या निर्णयाला अनुकूल आहे’

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 13, 2012, 10:11 AM IST

www.24taas.com, नागपूर
‘९० वर्षांपेक्षा जुन्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास ही राज्यशासनाची जबाबदारी आहे. पण, बीडीडी चाळी हेरिटेजमधून वगळण्याचा निर्णय अगोदर महापालिकेनं घ्यावा, राज्य शासन या निर्णयाला अनुकूल आहे’ असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत स्पष्ट केलंय.
मुंबईतील बीडीडी चाळींचा समावेश हेरिटेज समितीने ‘श्रेणी तीन’मध्ये केलेला आहे. राष्ट्रवादीचे प्रकाश बिनसाळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या चाळींचा प्रश्न उपस्थित केला. मुंबई महापालिकेचा हेरिटेज यादीसंदर्भातील अंतिम निर्णय राज्य शासनाला कळविण्यात आल्यानंतर त्या यादीतून वगळण्यात येतील, असं आश्वा सन गृहनिर्माण राज्य मंत्री सचिन अहीर यांनी विधानसभेत दिलं. पण, त्यामुळे विरोधकांचं समाधान मात्र झालं नाही. बीडीडी चाळी हेरिटेज आहेत किंवा नाहीत, याबाबत त्यांनी ठोस उत्तर देण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी सभागृहात उपस्थित होते. या प्रसंगाला तोंड देण्यासाठी मग मुख्यंमंत्री पुढे सरसावले. ‘मुख्य सचिवांनी आधी पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार केला होता पण मंत्रालयाला लागलेल्या आगीत तो जळाला. पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील चाळींच्या पुनर्विकासासाठी त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. इतर चाळींसंदर्भात हेरिटेज समिती आणि महापालिकेशी चर्चा केली जाईल’ असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
मुंबईतल्या सुमारे साडेनऊशे वास्तूंना राज्य सरकारनं हेरिटेज दर्जा दिलाय. यात मुंबईची सर्वात जुनी वस्ती असलेले कोळीवाडे, बीडीडी चाळी, इतर जुन्या चाळी, जुने बंगले आणि अनेक पर्यटन स्थळांचा समावेश आहे. सेटं एन्ड्रयूजचं ओडिंटरियम आणि महाविघालयही शंभर वर्ष जुनं असल्यानं हेरिटेजच्या यादीत टाकण्यात आलंय.