www.24taas.com, ठाणे
ठाण्यामध्ये मुंबई विद्यापीठाचं केंद्र उभारण्यासाठी महापालिकेनं वर्षभरापूर्वी जागा देऊनही अजून त्या ठिकाणी कामाला सुरूवात झाली नाही. उलट त्या जागेवर घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय.
ठाण्यामध्ये विद्यापीठाचं एक केंद्र बांधण्यात यावं, अशी ठाणेकरांची कित्येक वर्षांची मागणी आहे. विशेषतः ठाणे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला असता. त्यासाठी महापालिकेनं बाळकुंभ भागात आठ एकरचा भूखंड विद्यापीठाला दिला. पण वर्ष उलटून गेलं तरी या जागेवर कुठलंही बांधकाम सुरू झालेलं नाही. या भूखंडावर मैदान आणि स्वीमिंग पूल बांधण्यात येणार होता. पण ही जागा विद्यापीठाला दिल्यानं, तो प्रस्तावही बारगळला.
सध्या या जागेवर घाणीचं प्रचंड साम्राज्य आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे या जागेवर असंख्य सापांनी कब्जा केलाय. तरीही या प्रश्नाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. कमी पैशात ही जागा विद्यापीठाला मिळाली आहे. तरीही विद्यापीठ उदासीन का, शासनानंही याकडे लक्ष का दिलं नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत योग्य ती कारवाई केली तर लाखो विद्यार्थ्यांचं कल्याण होणार आहे.