www.24taas.com, डोंबिवली
डोंबिवलीत भर रस्त्यात एका युवकाची हत्या करण्यात आलीय. तरूणीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओंना जाब विचारणाऱ्या १९ वर्षीय संतोष विचीवोरा याच्यावर सोमवारी रात्री ९.३० च्या दरम्यान पाच जणांनी चाकूनं हल्ला केला. या घटनेत संतोषचा जागीच मृत्यू झालाय.
डोंबिवलीतल्या नवनीत नगरच्या गेटजवळ युवतींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओंना संतोषने जाब विचारला होता. त्यामुळे चिडलेल्या रोड रोमिओंनी संतोषवर चाकूने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात संतोषचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी असणाऱ्या दोघांनी संतोषला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला.
पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून १८ वर्षीय पंकज पाल या तरुणाला अटक केलीय. तर इतर चार आरोपी अल्पवयीन आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेलं शस्त्रही जप्त केलंय.
या घटनेनं ३ नोव्हेंबर रोजी मुंबईत घडलेल्या एका घटनेची आठवण ताजी केलीय. तरुणींची छेड काढणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या तरुणांची हत्या झाल्याची घटना मुंबईत घडली होती. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली होती.