www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
कल्याणमधल्या नितीन पडाळकर आत्महत्येप्रकरणी नेरुळच्या डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागच्या दीड वर्षांपासून हे दोघे नितीनचा मानसिक छळ करत होते, अशी माहिती आता समोर आलीय. याबाबत डी.वाय. पाटील महाविद्यालयाला पत्र देणार असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दिलीय.
रॅगिंगला कंटाळून नितीन पडवळकर या १९ वर्षीय मुलाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री विठ्ठलवाडी- उल्हासनगर रेल्वेमार्गावर रेल्वेखाली आत्महत्या केली.
नेरूळमधील डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नितीनने मित्रांना भेटायला जात आहे असे सांगून शुक्रवारी संध्याकाळी साधारण ६ वाजता घर सोडले. मात्र शुक्रवारी रात्री विठ्ठलवाडी ते उल्हासनगर या मार्गावर रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.
पोलीस तपासात त्याच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली आहे. ‘दोन मित्रांनी माझे रॅगिंग केले आहे. त्यालाच कंटाळून मी आत्महत्या करत आहे.’ असे नितीनने त्या चिठ्ठीत नमूद केले आहे. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.