www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरीतल्या जाकादेवी गावातल्या सेंट्रल बँकेवर भर दिवसा धाडसी दरोडा टाकण्यात आलाय. पाच अज्ञान व्यक्ती आलीशान गाडीतून आले आणि बँकेचा लंच टाईम सुरु होण्याआधी जबरदस्तीने घुसले. यावेळी झालेल्या गोळीबारात बँकेच्या शिपायाचा जागीच मृत्यू झाला. तर बँकेतील आणखी एक शिपाई गंभीर जखमी झालाय. फिल्मिस्टाईलने बँक लुटत दरोडेखोरांनी बँकेतील ९ लाख ७० हजार रुपये पळवले.
रत्नागिरीपासूनजवळ असणाऱ्या जाकादेवीतल्या सेंट्रल बँकेत फिल्मिस्टाईलने दरोडा घालण्यात आला. दुपारी १.५५ च्या सुमारास एलएनट्रा गाडीतू काही अज्ञात व्यक्ती आले. या बँकेत सर्व महिला कर्मचारी आहेत. त्याचा फायदा घेत त्यांनी बँकेच्या पहिल्या काउंटरवर बसलेल्या महिलेच्या कानाला पिस्तुल लावलं आणि त्यानंतर दरोडेखोरांनी बँकेच्या लाँकरच्या चाव्या मागितल्या. मात्र या चाव्या देण्यास कमर्चा-यांनी विरोध केला. त्यावेळी बँकेतील शिपाई संतोष चव्हाण पुढे आला. त्यांनी विरोध केल्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार केला. यात संतोषच्या पाठिच्या कण्यात गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
चोरट्यांनी आणखी एक गोळी झाडली. ही गोळी बँकेतील आणखी एक शिपाई सुरेश याच्या पोटात लागली. शटर बंद करुन सुद्धा दरोडेखोर बँकेत येणाऱ्या वक्तींना आत घेवून त्यांना ओलीस ठेवत होते. बँकेच्या तिजोरीच्या चाव्या दिल्यानंतर दरोडेखोरांनी बँकेतील ९ लाख ७० हजार रुपये लुटून नेले. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे. तर बॅँकेत असणाऱ्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाल्यानं त्याची मदत पोलिसांना तपासात होणार आहे.
सध्या पोलिसांच्या क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. ही संधी चोरट्यांनी साधली. परवापासून हे दरोडेखोर गावात पाळत ठेवून होते. हे सराईत गुन्हेगार असल्याचा संशय आहे. बँकेत बोलताना या वक्तींचे संभाषण हिंदीतून होते. पोलिस अधीक्षक आणि आयजी यांनी बँकेत जाऊन पाहणी केली. दरोडेखोरांनी माजवलेला तांडव पाहून अवाक झालेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.