`एमआयडीसी` प्रकल्पातून जाधवांची जमीन कशी वाचली?`

निसर्गरम्य कोकण सध्या भकास करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न दिसतोय. कारण गुहागर-चिपळूण तालुक्याच्या मध्यावर्ती अर्थात मार्गताम्हाणे येथे येऊ घालेल्या एमआयाडीसी प्रकल्पाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवायलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 18, 2014, 06:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
निसर्गरम्य कोकण सध्या भकास करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न दिसतोय. कारण गुहागर-चिपळूण तालुक्याच्या मध्यावर्ती अर्थात मार्गताम्हाणे येथे येऊ घालेल्या एमआयाडीसी प्रकल्पाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवायलाय.
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या सातबारा उताऱ्यांवर ‘एमआयडीसी’ असा शेरा मारणाऱ्या शासनाचा शेतकरी आणि ग्रामस्थांनी विरोध केलाय. या प्रकल्पात इथल्या चौदा गावांना विस्थापित केलं जाणार आहे. विशेष म्हणजे ही ‘एमआयडीसी’ ज्या ठिकाणी आहे त्याच्या आजुबाजूची जागा माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांची असल्याचा आरोप आता ‘मनसे’ने केलाय. त्यामुळे जैतापूर, एन्रॉन याप्रमाणेच एमआयडीसी प्रकल्पालाही इथल्या ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय.
विनायक लांजेकर या शेतकऱ्याची जमीनही ‘एमआयडीत’ गेलीय. त्यांचा उदरनिर्वाह याच जमिनीतून होतो. मात्र, शासनाने परस्पर सातबाऱ्यावर ‘एमआयडीसी; असा शेरा मारलाय, असा आरोप त्यांनी केलाय.
चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील मध्यावर्ती ठिकाणी म्हणजेच मार्गताम्हाणे येथे एमआयडीसीचा प्रस्ताव आहे. त्यासाठी भू संपादनाचा प्रयत्न सध्या महसूल विभागाकडून सुरू आहे. प्रकल्पाला विरोध करत शासनाची भू-संपादन करण्यासाठी गेलेल्या कमिटीलाच इथल्या ग्रामस्थांनी गावातून हाकलून दिलंय. त्यामुळे या प्रस्तावित एमआयडीसीचं भवितव्य आता अंधारात आहे.
विशेष म्हणजे या ‘एमआयडीसी’साठी एकूण १४ गावं विस्थापित होणार आहेत. त्यामध्ये चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील सात-सात गावांचा समावेश आहे आणि ही सर्व गावं राष्ट्रवादी समर्थक मानली जातात. परंतु, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्या आजुबाजूची जमीन ही राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांची जामीन आहे, असा आरोप मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर यांनी केलाय.
खरं शेतकऱ्यांच्या मनाविरोधात हा प्रकल्प आणला जातोय. पहिल्यांदा रत्नागिरी गॅस प्रकल्प... त्यानंतर जैतापूरला स्थानिकांनी विरोध केला होता. पण, त्यांच्या विरोधाला न जुमानता हे प्रकल्प उभे राहिले... आणि आता ‘एमआयडीसी’ प्रकल्पाला इथल्या नागरिकांनी विरोध करायला सुरूवात केलीय. त्यामुळे त्यांचं आंदोलन हे कितपत यशस्वी होणार? हे पाहणं आता औसुक्याचं ठरणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.