www.24taas.com, डोंबिवली
डोंबिवलीमध्ये 3 डिसेंबरला छेडछाडीच्या घटनेत एका 19 वर्षाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. या तरुणाची हत्या केलेल्या गुन्हागारांना तर पोलिसांनी पकडलं आहे पण पिडितांना होणारा त्रास इथेच थांबत नाही तर घटनेनंतर पिडितांच्या कुटुंबांना सामाजिक आणि आर्थिक वेदनांना सामोरं जावं लागतंय.
संतोष..ज्यानं एका मुलीची छेडछाड होत असताना मध्यस्थी केली आणि आपला जीव गमवला. संतोषची हत्या केलेले आरोपी गजाआड आहेत. संतोषच्या जाण्यानं त्याचं कुटूंब मात्र उघड्यावर आलंय. दोन वर्षापूर्वी वडिलांच्या निधनानंतर संतोषला शिक्षण सोडून नोकरी करावी लागली. त्याच्या तोकड्या पगारावर कसंबसं घर चालत होतं. त्यातच संतोषच्या आईलाही कॅन्सर असल्याचं निदान झालं.. येणा-या अडचणींवर मात करत असतानाच संतोषचाही निष्पाप जीव गेला. त्याच्यामागं आता एक छोटी बहिण आणि भाऊ आहेत. पती नसताना आणि तरुण मुलगा गेल्यावर घर कसं चालवायचं असा प्रश्न कॅन्सर झालेल्या आईला पडलाय.
एकिकडं संतोषच्या परिवाराला आर्थिक अडचणीं समोरं जावं लागत आहे तर दुसरीकडे पिडित मुलीला आणि तिच्या परिवाराला समाजाच्या बद्नामीला..या मुलीलाही वडिलांची छत्रछाया नसल्यामुशे तिची आई आणि तीला दोघींनाही नोकरीकरुनच घर चालवावं लागतं. मात्र घटनेपेक्षा अधिक लोकांच्या दुषणांचा अधिक त्रास होत असल्याचा अनुभव पिडिताच्या आईने सांगितला.
रस्त्यावर उतरुन आंदोलन करुन छेडछाड, विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांचा निषेध करणा-या याच समाजाची दुसरी बाजु पिडितांच्या या व्यथेच्या निमित्ताने समोर येताना दिसतेय.