www.24taas.com, मुंबई
कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवास आता काहीप्रमाणात सुखकर होणार आहे. सुट्टीचा हंगाम लक्षात घेऊन ३८ विशेष गाड्या तर जनशताब्दी, राज्यराणी एक्स्प्रेस या गाडींचे डबे वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दीवर थोडासा दिलासा मिळणार आहे.
कोकणासाठी मध्य रेल्वेने विशेष सेवा सुरू केली आहे. दादर-सावंतवाडी मार्गावर ३८ विशेष गाड्या सुट्टीच्या हंगामात सोडण्यात येणार आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून २१ एप्रिल ते २ जूनपर्यंत रेल्वेच्या गाड्या धावणार आहेत.
दादर स्थानकातून सकाळी ७.५० वाजता गाडी सुटेल. रविवार, मंगळवार, शुक्रवार या दिवशी विशेष गाड्या सोडण्यात येतील. तर मुंबईला येण्यासाठी सावंतवाडीहून पहाटे ५.०० वाजता गाडी सुटेल. ही सेवा सोमवार, बुधवार, शनिवार सुरू राहिल.
विशेष सेवा सुरू करण्याबरोबच एक्स्प्रेस गाड्यांना जादा डबे जोण्याच निर्णय घेण्यात आला आहे. जनशताब्दी आणि राज्यराणी एक्स्प्रेस या कोकणवासीयांसाठी प्रमुख गाड्यांचे डबे वाढवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला असून या गाड्या आता १२वरून १७ डब्यांच्या होणार आहेत. त्यामुळे या गाड्यांची क्षमता जवळपास ७०० प्रवाशांनी वाढणार आहे.
कोकणवासीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या एक्स्प्रेस गाड्यांना फक्त १२ डबे असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे या गाड्यांचे डबे वाढवण्याची मागणी केली जात होती. त्याबाबत, कोकण रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यास बोर्डाने मंजुरी दिली आहे.
सीएसटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला महिन्याभरात तिच्या वाट्याचे पाच डबे मिळणार आहेत. मात्र, दादर-सावंतवाडी राज्यराणी एक्स्प्रेसला जादा डब्यांसाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.