www.24taas.com, झी मीडिया, माथेरान
माथेरान परिसरातल्या ३ बिबट्यांची हत्या झाल्याचं उघड झालंय. रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमध्ये वन विभागानं कातडी विकायला आलेल्या २ आरोपींना अटक केल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघड झालीय. यानंतर आणखी ७ आरोपींना अटक करण्यात आलीय.
खालापूरमधल्या मोरबे धरणाजवळ असलेल्या वाडीतल्या एका रहिवाशाची एक बकरी बिबट्यानं मारली होती. त्यामुळं संतापलेल्या गोमा हरी वीर या ८५ वर्षांच्या वृद्धानं इतर प्राण्यांच्या बचावासाठी एका बकरीला कीटकनाशक लावून बिबट्यासाठी सापळा रचला. त्यामध्ये बिबट्याची एक मादी आणि एक बछडा मरण पावला.
मात्र आणखी एक बछडा त्यातून बचावला. पण या बछड्यालाही गोमा हरी वीर या वृद्धानं ठार मारलं. बछड्याची कातडी काढून टाकली. बिबट्याचं एक नखही स्थानिक व्यक्तीला विकलं. कातडी विकण्याचीही धडपड सुरू झाली.
दरम्यान या संदर्भात पनवेलच्या वन विभागाला माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून २ आरोपींना २७ डिसेंबरला अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आता आणखी ७ आरोपींना अटक करण्यात आलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.