www.24taas.com, वॉशिंग्टन
पुरुष हे आनंदी असून स्त्रिया सतत कटकट करत असतात असा जर तुमचा समज असेल, तर तो आता दूर करा. कारण पुरूषांपेक्षा स्त्रिया या अधिक आनंदी असतात, असा दावा अमेरिकन शास्त्रज्ञांनी केला आहे. याचं कारण स्त्रियांमध्ये असणारं एक विशेष जीन. या जीनमुळे स्त्रिया पुरूषांपेक्षा जास्त खुश राहातात.
‘डेली मेल’मधील बातमीनुसार दक्षिण फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यासंदर्भात शोध लावला आहे. त्यांच्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला आहे, की पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया आनंदी राहू शकतात. यामागे त्याच्या मंदूमधील ठराविक जीन्सची उपस्थिती कारणीभूत असते.
‘एमएओए’ नावाचं हे जीन मेंदूमधील आनंद निर्माण करणाऱ्या ग्रंथींना प्रभावित करत असतं. स्त्री तसंच पुरूषांच्याही वागणुकीचा संदर्भ या जीन्समुळे लागतो. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी 350 पुरूष तसंच महिलांना त्यांच्या आनंदाबद्दल विचारलं. या लोकांच्या लाळेचा नमुना घेऊन त्याची डीएनए तपासणी केली. यातून शास्त्रज्ञांना स्त्रियांच्या अधिक आनंदी असण्याचा शोध लागला.