www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट नाही. मात्र, तुम्हाला ट्विटर या सोशल साईट माध्यमातून टिव टिव करायची झाल्यास ते आता शक्य होणार आहे. तुमच्या मोबाईलवर इंटरनेट शिवाय ट्विटर सुरू करता येणार आहे. त्यासाठी यूएसएसडी तंत्रज्ञानाचा वापर करून ‘युटोपिया मोबाईल ऍप्स’ची निर्मिती केली आहे.
या अॅप्सच्या माध्यमातून इंटरनेटशिवाय कोणत्याही मोबाईलमध्ये आता ट्विटर वापरता येणार आहे. ट्विटर या सोशल साईट्स वापरामध्ये सेलिब्रिटींपासून ते राजकारण्यांपर्यंत सगळ्यांचाच कल वाढला आहे. तसेच या सोशल साईट्सचा वाढता वापर लक्षात घेता युटोपिया या अॅप्सची निर्मिती केली आहे.
देशात मोबाईलचा वापर करणारे ७० लाख ग्राहक आहेत, तर त्यातील ८० टक्के लोकांजवळ इंटरनेट कनेक्शन नाही. अशा ग्राहकांनाही ट्विटर या सोशल साईट्सचा वापर करता यावा यासाठी सिंगापूरच्या युटोपिया कंपनीने युटोपिया या अॅप्सची निर्मिती केली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांकडे टूजी, थ्रीजी किंवा जीपीआयएस आदी नाहीत, अशा ग्राहकांना स्टॅण्डर्ड कोडच्या माध्यमातून ट्विटर वापरता येणार आहे.
हे अॅप्स ३० देशांमध्ये आणि जागतिक पातळीवरच्या ४५ मोबाईल कॅरिअर्समध्ये उपलब्ध केले आहे. त्यामुळे गुगल टॉक, फेसबुकनंतर येत्या वर्षाच्या जानेवारी ते मार्चदरम्यान हे अॅप्स मोबाईलवर वापरता येणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.