www.24taas.com,लंडन
प्रत्येक मनुष्याला मोहिनी घालणाऱ्या सोने या अत्यंत मौल्यवान धातूचा सोनेरी हा मूळ नैसर्गिक रंग प्रत्यक्षात न बदलता फक्त त्याचा दृश्यमान रंग हवा तसा करून घेण्याचे तंत्र वैज्ञानिकांनी प्रथमच शोधून काढले आहे.
सोन्याच्या पृष्ठभागावर नाजूक नक्षीकाम ‘इम्बॉसिंग’ करून किंवा कोरीवकाम करून केले तर सोन्याच्या प्रकाशाचे परावर्तन करण्याच्या आणि तो शोषून घेण्याच्या पद्धतीत बदल करता येतो. परिणामी सोने प्रत्यक्षात सोनेरीच असले तरी ते आपल्या डोळ्य़ांना मात्र सोनेरी दिसत नाही, असा निष्कर्ष साऊदम्पटन विद्यापीठातील संशोधकांनी प्रयोगांती काढला आहे.
वैज्ञानिकांच्या या संशोधनाची माहिती ‘ऑप्टिक्स एक्स्प्रेस’ आणि ‘जर्नल ऑफ ऑप्टिक्स’ या वैज्ञानिक मॅगझीनमध्ये प्रसिद्ध झाले आहे. हे तंत्र केवळ सोन्यापुरते मर्यादित नसून चांदी, अँल्युमिनियमसह इतरही धातूंचे दृश्यमान रंग त्यामुळे बदलता येतील.
जी वस्तू प्रकाशातील लाल रंग परावर्तित करते आणि इतर रंग शोषून घेते ती वस्तू मानवी डोळ्य़ांना लाल दिसते. प्रकाश शास्त्रातील याच मुलभूत तत्त्वावर हे नवे तंत्र आधारित आहे. धातूंच्या पृष्ठभागावर अगदी १00 नॅनोमीटर एवढय़ा आकाराच्या नक्षीकामाचे इम्बॉसिंग केले तरी तो धातू कोणत्या रंगाचे शोषण करील आणि कोणते रंग परावर्तित करील हे नियंत्रित केले जाऊ शकते.
दृश्यमान रंगातील हे बदल त्या धातूच्या पृष्ठभागावर केलेल्या इम्बॉसिंगच्या उठावदारपणाचे प्रमाण अथवा कोरीवकामाची खोली, आकार यावर अवलंबून असते.