मुंबई : गेल्या मंगळवारी सर्फराज अहमदला पाकिस्तान टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. पण, पाकिस्तानसोबतच याचा जल्लोष उत्तर प्रदेशातील इटावामध्ये झाला. पण याचा राष्ट्रवादाशी काही संबंध नाही, असे स्पष्टकरण देण्यात आलेय.
सिद्दीकी आणि सर्फराज हे खरं तर मोहाजिर म्हणजेच भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेले आहेत. पाकिस्तानात मोहाजिरांवर अन्याय होतो असा आरोप नेहमी केला जातो. त्यामुळे सरफराज कधी कर्णधार होईल, अशी आशा सिद्दीकी यांना नव्हती. पण, त्याच्या नियुक्तीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
इटावामध्ये राहणारे महबूब हसन सिद्दीकी हे सरफराजचे सख्खे मामा लागतात. सिद्दीकी आणि सरफराजची आई अकीला हे सख्खे भावंडं आहेत. सिद्दीकी हे इटावातील भीमराव कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करतात. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार ही बातमी त्यांच्या परिसरात पसरताच त्यांच्या शेजाऱ्यांनी मिठाई वाटली.
सिद्दीकी हे गेल्याच वर्षी पाकिस्तानात गेले होते. सरफराजच्या लग्नाला त्यांनी उपस्थिती लावली होती. सरफराजचा एक धाकटा भाऊ पाकिस्तानच्या अंडर १९ संघाकडून आज क्रिकेट खेळत आहे.