युसरा मर्दिनी : कहाणी एका जिद्दीची

रिओ ऑलिम्पिकमध्ये एका नावाची सध्या चर्चा आहे युसरा मार्दिनी. ऑलिम्पिकमधलं चर्चेतलं नाव. वय वर्ष अठरा. या अठरा वर्षातला तिचा प्रवास थक्क करणारा आहे. 

Updated: Aug 10, 2016, 01:48 PM IST
युसरा मर्दिनी : कहाणी एका जिद्दीची title=

रिओ : रिओ ऑलिम्पिकमध्ये एका नावाची सध्या चर्चा आहे युसरा मार्दिनी. ऑलिम्पिकमधलं चर्चेतलं नाव. वय वर्ष अठरा. या अठरा वर्षातला तिचा प्रवास थक्क करणारा आहे. 

युसराला स्वतःचं घर नाही, तिचा स्वतःचा म्हणता येईल, असा देशही नाही. ती प्रतिनिधित्व करते निर्वासितांचं अर्थात रेफ्युजी कॅम्पचं. युसरा मूळची सिरीयामधली. सिरीयात तिच्या घरावर हल्ला झाला. त्यात तिचं घर उध्वस्त झालं. या हल्ल्यानंतर तिनं सीरिया सोडण्याचा निर्णय घेतला. 

युसरा आणि तिची बहीण सारा यांनी लपत छपत दमास्कस, बैरुत, लेबेनॉन आणि तुर्की असा खडतर प्रवास केला. तिथून छोट्या बोटीनं त्या ग्रीसच्या किना-यावर जात होत्या. बोट ग्रीसकडे निघाली... ६ माणसं मावतील इतक्या लहान बोटीत २० लोक भरली होती. त्यामुळे मध्येच बोटीचं इंजिन बंद पडलं.  या बोटीतल्या फक्त चौघांना पोहोता येत होतं. त्या चौघांनी पाण्यात उडी मारून सोबत बोट खेचून नेण्याचा निर्णय घेतला. 

संध्याकाळची वेळ, खवळलेला समुद्र आणि गोठविणारी थंडी यांचा सामना करत त्यांनी बोट खेचायला सुरुवात केली. पण युसरा सोडून बाकी सगळे थकले.... मी एक स्विमर असताना माझा पाण्यात मृत्यू होणं योग्य नाही. मी पाण्याशी सामना करायलाच हवा, असं युसरानं ठरवलं. 

अखेर युसरानं चार तास पोहत बोट ओढली आणि किना-यावर पोहोचवली. समुद्राशी दोन हात करत युसरानं २० लोकांचा जीव वाचवला. त्यानंतर युसरानं कडाक्याच्या थंडीत तिच्या बहिणीसोबत ग्रीस, सर्बिया आणि हंगेरी असा तीन देशांचा प्रवास चालत पूर्ण केला आणि शेवटी जर्मनी गाठलं. तिथे ती निर्वासितांच्या छावणीत राहू लागली. तिथे तिनं पुन्हा स्विमिंग सुरू केलं. 

त्यानंतर काही दिवसांतच ऑलीम्पिक मध्ये पहिल्यांदाच "निर्वासितांचा संघ" समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. दहा जणांच्या या संघामध्ये १८ वर्षांच्या युसराची निवड झाली. ऑलिम्पिकच्या हिटसमध्ये ती जिंकली पण सेमी फायनलमध्ये तिचं आव्हान संपुष्टात आलं. युसरा ऑलिम्पिकमधून बाहेर पडली असली तरी तिनं दाखवलेलं हे शौर्य, जिद्द आणि चिकाटी ही अत्यंत कौतुकास्पद आहे.