'पुढच्या वर्ल्डकपपर्यंत धोनीनंच कॅप्टन्सी सांभाळावी'

नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं सध्याचा 'टीकेचा धनी' बनलेल्या महेंद्र सिंग धोनीचा बचाव केलाय. धोनीनं पुढच्या वर्ल्डकपपर्यंत भारताच्या सीमित ओव्हरची धुरा आपल्या खांद्यावरच सांभाळावी, असं सेहवागनं म्हटलंय. 

Updated: Oct 29, 2015, 04:00 PM IST
'पुढच्या वर्ल्डकपपर्यंत धोनीनंच कॅप्टन्सी सांभाळावी' title=

नवी दिल्ली : नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं सध्याचा 'टीकेचा धनी' बनलेल्या महेंद्र सिंग धोनीचा बचाव केलाय. धोनीनं पुढच्या वर्ल्डकपपर्यंत भारताच्या सीमित ओव्हरची धुरा आपल्या खांद्यावरच सांभाळावी, असं सेहवागनं म्हटलंय. 

'जर असं झालं तर तो आपल्यामागे एक सशक्त टीम बनवून जाईल... पण, त्यानं आत्ताच निवृत्ती घेतली तर आत्ताच लोकांना विचार पडलाय की पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर कोण बॅटींग करू शकेल... धोनी नसेल तर पाचवं, सहावं आणि सातवं स्थान एकदम रिकामं होईल... आणि कुणीही इतक्या चांगल्या पद्धतीनं मॅच संपवणारं टीममध्ये नसेल. ' असं म्हणत टीम इंडियाची कमकुवत बाजुही सेहवागनं परखडपणे समोर ठेवलीय. 

अधिक वाचा - 2007 मध्येच निवृत्तीचा विचार होता, पण सचिननं रोखलं - वीरेंद्र सेहवाग

धोनी आणि सेहवागमध्ये मत-मतांतर?
एका टीव्ही कार्यक्रमा दरम्यान बोलताना सेहवागनं हे वक्तव्य केलंय. यावेळी, धोनीमुळेच आपल्याला टीमबाहेर राहावं लागलं ही गोष्टही सेहवागनं धुडकावून लागलीय. 'मला नाही वाटत की धोनीनं असं काही केलं असेल... तो मनानं खूप चांगला आहे. सगळेच सीनियर खेळाडूही त्याचा आदर करतात. जेव्हा तो कॅप्टन बनला तेव्हा सगळे सीनियर खेळाडूही त्याच्या कॅप्टन्सीमध्ये खेळले... त्याला मार्गदर्शन केलं आणि काही चांगल्या सूचनाही केल्या आणि त्यानंही त्यांची अंमलबजावणी केली... आमच्या टीमनं टी 20, वनडे आणि टेस्ट मॅच जिंकल्या' असं म्हणत आपल्यात आणि धोनीमध्ये काही मतभेद असल्याच्या चर्चांना सेहवागनं पूर्णविराम दिला. 

अधिक वाचा - सेहवाग-सचिन पुन्हा एकत्र खेळतांना दिसणार


फाईल फोटो

सेहवागला कॅप्टन बनायचं होतं?
भारताचे माजी कोच ग्रेग चॅपल यांनी आपल्या पुस्तकात सेहवाग आणि धोनीमध्ये मतभेद असल्याचं म्हटलंय. याचं कारण देताना त्यांनी सेहवागला कॅप्टन बनायचं होतं, असाही उल्लेख केलाय. याविषयी बोलताना सेहवागनं, 'याबद्दल तुम्ही धोनीला विचारू शकता. आम्ही 2007 चा वर्ल्डकप एकत्र खेळला. मला कॅप्टन बनायचं होतं, असं म्हणणं साफ चुकीचं ठरेल. धोनी कॅप्टन बनला तेव्हा मी त्याच्या कॅप्टन्सीमध्ये खेळलो आणि आम्ही टी 20 वर्ल्डकप जिंकला' असंही म्हटलंय. 

अधिक वाचा - व्हिडीओ | शोएबने सेहवागला चिडवल्यानंतर सचिनने मारलेला षटकार 

धोनीबद्दलचे 'ते' वक्तव्य... 
जुलै 2012 मध्ये एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना सेहवागनं 'वर्ल्डकप धोनीच्या कॅप्टन्सीमुळे जिंकलेली नाही तर यासाठी टीमच्या चांगल्या कामगिरीमुळे जिंकला' असं वक्तव्य केलं होतं. याची आठवण करून दिली तेव्हा आपल्या वक्तव्याचं सेहवागनं पुन्हा एकदा समर्थन केलं. इथं बसलेल्या कोणत्याही व्यक्तीला विचारा की माझं वक्तव्य चुकीचं होतं की योग्य... माझं म्हणणं चुकीचं नव्हतं... ते केवळ चुकीच्या पद्धतीनं समोर मांडण्यात आलं... मी त्यावेळी धोनीवर टीका केली नव्हती... मी फक्त इतकंच म्हटलं की श्रेय फक्त कॅप्टनला नाही तर संपूर्ण टीमला दिलं गेलं पाहिजे... धोनी आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ कॅप्टन ठरलाय... सौरवला पछाडून त्यानं टेस्ट, वनडे, टी 20 आणि दोन वर्ल्डकप जिंकलेत. याला कुणीही नाकारणार नाही. पण केवळ एका व्यक्तीला श्रेय देणं चुकीचं आहे, असं यावर सेहवागनं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.