मुंबई : माजी खेळाडू रवी शास्त्री यांची बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय बांगर बॅटिंग कोच आणि बी. अरुण हे बॉलिंग कोच असणार आहेत.
१०जूनपासून भारताचा बांग्लादेश दौरा सुरु होईल. या दौऱ्यात एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. ७ जूनला टीम इंडिया बांग्लादेशला रवाना होईल. बीसीसीआयने दौऱ्यापूर्वी या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. बीसीसीआयने सोमवारी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर व व्हिव्हिएस लक्ष्मण यांची सल्लागार समितीत निवड केली होती. त्यानंतर आज लगेच रवी शास्त्री यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बांगलादेश दौऱ्यानंतर कायमस्वरुपी प्रशिक्षकांची निवड करण्यात येईल, असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले. यापूर्वी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी डंकन फ्लेचर यांच्याकडे होती. त्यांच्या करार संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयने त्यांच्या करारात वाढ केली नाही. त्यामुळे प्रशिक्षकपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
संजय बांगर यांना फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. तर, बी. अरुण यांना गोलंदाजीचे प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आर. श्रीधर हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील. यापूर्वी हे तिघेही जण भारतीय संघाच्या प्रशिक्षकांच्या फळीत होते. त्यांना कायम ठेवण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.