आयपीएल टीमनी दिला या दिग्गजांना डच्चू

आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी टीमनी काही दिग्गज खेळाडूंना डच्चू दिला आहे.

Updated: Dec 19, 2016, 04:21 PM IST
आयपीएल टीमनी दिला या दिग्गजांना डच्चू  title=

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी टीमनी काही दिग्गज खेळाडूंना डच्चू दिला आहे. डच्चू दिलेल्या या खेळाडूंचा पुन्हा एकदा लिलाव करण्यात येणार आहे. आयपीएलच्या टीमनी बाहेरचा रस्ता दाखवलेल्या या खेळाडूंमधली काही नावं धक्कादायक आहेत.

दिल्ली डेअरडेव्हिल्स

पवन नेगी : मागच्या आयपीएल लिलावामध्ये दिल्लीनं पवन नेगीसाठी आठ कोटी रुपये खर्च केले. एवढे पैसे देऊनही पवन नेगीनं निराशा केल्यामुळे यंदा मात्र दिल्लीनं पवनला डच्चू दिला आहे.

इम्रान ताहीर : दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इम्रान ताहीरलाही दिल्लीच्या टीमनं बाहरेचा रस्ता दाखवला आहे.

मुंबई इंडियन्स

कोरे अंडरसन : गेले काही मोसम मुंबईकडून खेळलेला न्यूझीलंडचा ऑल राऊंडर कोरे अंडरसन यंदा मुंबईकडून खेळताना दिसणार नाही. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे दोन्ही ऑल राऊंडर असल्यामुळे कोरे अंडरसनला वगळण्यात आल्याचं बोललं जात आहे.

मार्टिन गुप्टिल : कोरे अंडरसनबरोबरच मुंबईच्या टीममध्ये असणाऱ्या दुसरा किवी खेळाडून मार्टिन गुप्टिललाही मुंबईनं घरचा रस्ता दाखवला आहे.

उन्मुक्त चंद आणि नथ्थू सिंग : भारताचा अंडर 19 टीमचा माजी कॅप्टन उन्मुक्त चंद आणि नथ्थू सिंग या दोघांनाही वगळण्यात आलं आहे.

सनरायजर्स हैदराबाद

मागच्या वर्षीचे आयपीएल चॅम्पियन सनरायजर्स हैदराबाद टीमनं त्यांच्या टीममध्ये मोठे बदल केलेले नाहीत. ओईन मॉर्गन, आदित्य तरे, ट्रेन्ट बोल्ट आणि करन शर्मा हे खेळाडू यंदा हैदराबादकडून खेळताना दिसणार नाहीत.

किंग्ज इलेव्हन पंजाब

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या टीमनं मिचेल जॉनसन, कायल अबॉट आणि फरहान बहारदीन यांना डच्चू दिला आहे.

गुजरात लायन्स

हैदराबादप्रमाणेच गुजरात लायन्सनही त्यांच्या टीममध्ये फारसे बदल केले नाहीत. डेल स्टेन वगळता गुजरात त्यांच्या कोणत्याच मोठ्या खेळाडूला सोडलं नाही.

रायजिंग पुणे सुपरजायंट्स

चेन्नईकडून खेळताना धोनी आणि फ्लेमिंगच्या जोडीला आयपीएलमध्ये सर्वाधिक यश मिळालं. पण पुण्याकडून मात्र कॅप्टन आणि कोचची ही जोडी सपशेल अपयशी ठरली. मागच्या वर्षीच्या या कामगिरीचा परिणाम पुण्याच्या टीमवरही झाला आहे. पुण्यानं बेली, इशांत शर्मा, इरफान पठाण, केव्हीन पिटरसन, आर.पी.सिंग, थिसारा परेरा आणि एल्बी मॉर्कल आणि काही स्थानिक खेळाडूंना डच्चू दिला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर

आयपीएलमधली सर्वात भेदक बॅटिंग असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरनं बॅट्समनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. बॉलिंगमध्ये मात्र कोहलीच्या टीमनं क्रिस जॉर्डन, वरुण अरॉन, केन रिचर्डसन आणि डेव्हिड विजला वगळलं आहे.

कोलकता नाईट रायडर्स

शाहरुखच्या टीमनं तब्बल सहा खेळाडूंना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जेसन होल्डर, मॉर्कल, ब्रॅड हॉग आणि शॉन टॅटचा समावेश आहे.