मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्याबद्दल फारशी कोणालाही माहिती नाही. धोनीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मात्र आता उलगडा होणार आहे. 'एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी' हा धोनीच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल.
धोनीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अशीच एक बातमी इंग्रजी वृत्तपत्र मुंबई मिररनं छापली आहे. धोनीनं साक्षीबरोबर लग्न केलं, पण साक्षीही ही धोनीची पहिली गर्लफ्रेंड नव्हती. 2002 साली जेव्हा धोनी भारताकडून खेळण्यासाठी संघर्ष करत होता, तेव्हा तो प्रियांका झा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. प्रियांकाबरोबर लग्न करण्याचा निर्णयही धोनीनं घेतला होता.
याच दरम्यान 2003-2004 साली धोनीची झिम्बाब्वे आणि केनियाला जाणाऱ्या भारताच्या अ संघामध्ये निवड झाली. केनिया आणि पाकिस्तानबरोबरच्या ट्रँग्युलर सीरिजमध्ये धोनीनं 72.40 च्या सरासरीनं तब्बल 362 रन बनवल्या. धोनीच्या याच कामगिरीमुळे त्याची 2004 मध्ये बांग्लादेश दौऱ्यासाठी निवड झाली.
धोनी ज्यावेळी क्रिकेटमध्ये यश मिळवत होता, त्याचवेळी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात हृदयद्रावक घटना घडली. धोनीची गर्लफ्रेंड प्रियांकाचा अपघातामध्ये मृत्यू झाला. यानंतर मात्र वर्षभर धोनी त्याच धक्क्यामध्ये होता. या धक्क्यामुळे धोनी कधीच सावरू शकणार नाही आणि याचा परिणाम त्याच्या क्रिकेटवर होईल असं त्याच्या मित्रांना वाटत होतं.
धोनीनं मात्र सगळ्यांना चुकीचं ठरवलं आणि क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व आणि नेतृत्व करून भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले. अखेर 4 जुलै 2010 ला धोनीनं साक्षी सिंग रावत बरोबर लग्न केलं.