मुंबई: सचिन तेंडुलकर १९९७मध्येच निवृत्त होणार होता. टीम इंडियाचा कॅप्टन असतांना संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळं नैराश्यानं पछाडल्याची जाणीव मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला झाली होती आणि त्यातून क्रिकेटलाच विराम द्यावा का, असा टोकाचा विचारही त्याच्या मनाला स्पर्शून गेला होता.
मास्टरब्लास्टर सचिनच्या 'प्लेइंग इट माय वे' या बहुचर्चित आत्मचरित्रात प्रदीर्घ कारकिर्दीत आलेल्या या कटू प्रसंगाचं वर्णन करण्यात आलं आहे. हे आत्मचरित्र ६ नोव्हेंबरला प्रकाशित होणार असून सचिनच्या झळाळत्या कारकिर्दीतील अनेक अविस्मरणीय प्रसंगांचं वर्णन त्यात आहे.
१९९७च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात पहिल्या दोन कसोटी अनिर्णित राखल्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारताला विजयाची नामी संधी होती. केवळ १२० धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव अवघ्या ८१ धावांत आटोपला होता. या पराभवानंतर सचिननं स्वतःला तब्बल दोन दिवस एका खोलीत कोंडून घेतलं होतं.
त्यानंतरची वनडे मालिकाही भारतानं गमावली होती. सचिनला या नैराश्यातून बाहेर काढले ते त्याची पत्नी अंजलीनं. क्रिकेटची ही वाटचाल सुरू ठेवण्यासाठी तिनं सचिनला धीर दिल्याचंही सचिननं या आत्मचरित्रात नमूद केलं आहे.
...चेंडू कुरतडल्याच्या आरोपामुळं सचिन व्यथित
२००१च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सचिनवर चेंडू कुरतडल्याचा आरोप झाला होता. तत्कालिन पंच माईक डेनिस यांनी सचिनवर आक्षेप घेतला होता. सचिनवर असा आरोप करण्यात आल्यामुळं तो दौराच सोडून जाण्याच्या विचारात सचिन होता, असं सचिननं आपल्या या आत्मचरित्रात नमूद केलं आहे.
सचिननं म्हटलं आहे की, 'चेंडूच्या शिवणीवर माती लागली होती आणि ती अंगठ्यानं खरवडत होतो. पण मी चेंडू कुरतडला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पोर्ट एलिझाबेथ इथला तो दुसरा कसोटी सामना होता. सचिनवर चेंडू कुरतडल्याचा आरोप झाल्यामुळं सर्व भारतीय खेळाडूंमध्ये नाराजी होती आणि डेनिस यांना हटविण्यात आलं नाही तर कसोटी मालिकेवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला होता.'
सचिनचा त्यावेळचा सहकारी सौरव गांगुलीनं सचिननं आत्मचरित्रात केलेल्या नोंदीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'सचिननं चेंडू कुरतडण्याचा प्रश्नच येत नाही. एक तर चेंडू नवा होता आणि त्यामुळं तो कुरतडण्याचा काही संबंधच नव्हता.'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.