मुंबई : भारतीय क्रिकेट टीम चार टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाली आहे. 21 जुलैपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. याआधी भारतीय टीम वेस्ट इंडिजच्या टीमबरोबर सराव सामना खेळत आहे.
या मॅचआधी काही भारतीय खेळाडूंनी सोशल नेटवर्किंगवर समुद्रकिनाऱ्यावरचे बीयर हातात असलेले फोटो शेअर केले होते. या फोटोवरून बीसीसीआय नाराज झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
बीसीसीआयचे काही अधिकारी खेळाडूंच्या या वागणुकीबद्दल नाराज आहेत. याबद्दल खेळाडूंना कोणतीही लेखी तक्रार करण्यात आली नसली तरी चुकीचा संदेश सोशल नेटवर्किगंवर शेअर करू नका असा सल्ला बीसीसीआयकडून या खेळाडूंना देण्यात आला आहे.
शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये के.एल.राहुलच्या हातात बियर आहे. राहुलबरोबर स्टुअर्ट बिनी आणि उमेश यादवही या फोटोमध्ये होते. बीसीसीआयनं दिलेल्या या तंबीनंतर मात्र हे फोटो डिलीट करण्यात आले आहेत.
भारतीय खेळाडू हे रोल मॉडेल असतात. अनेक लहान मुलं या खेळाडूंसारखच वागायचा प्रयत्न करतात. त्यामुळे खेळाडूंनी चांगलं वर्तन करावं, असं बीसीसीआयनं या खेळाडूंना सांगतिलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.