www.24taas.com, लातूर
शासकीय विश्रामगृहावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे, लातूरचे आमदार अमित देशमुख आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गुप्त बैठक झाली असून त्याला चा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, अमित देशमुख हे आपले जुने मित्र असल्यामुळे ते भेटायला आल्याचे राज यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष मुर्तूजा खान यांनी निषेध केला. राज ठाकरे आणि अमित देशमुखे यांची सकाळी भेट आणि नाष्टा झाल्याची जोरदार चर्चा होती.
सोलापूरची वादळी सभेतील राज ठाकरेंनी अजित पवार, आर. आर. पाटील यांच्यावर डागलेली तोफ आणि त्यानंतर अमित देशमुख आणि सतेज पाटीलांनी घेतलेली गुप्त भेट यामुळे राष्ट्रवादीतर्फे निषेध करण्यात आला.
मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे काल लातूर दौऱ्यावर होते. ते सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. राज ठाकरे आपल्या सभेतून महाराष्ट्र सरकारचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची टिंगल टवाळी करत आहेत. त्यांची निंदा करत आहेत. खालच्या दर्जावर जाऊन व्यक्तीगत टीका करत आहेत.
असल्या परिस्थितीत ते लातूर शहराच्या दौऱ्यावर आले असतांना राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याऐवजी लातूरच्या विश्रामगृहावर लातूरचे आमदार अमित देशमुख व पालकमंत्री ना. सतेज पाटील हे एका बंद खोलीत अर्धातास खलबत्ते करत होते. त्यानंतर त्यांनी मिळून नाष्टाही केला.
लातूर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची तातडीची बैठक घेवून त्यात आ. अमित देशमुख व पालकमंत्री यांच्या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला. हे कृत्य सत्तेतील आमदाराला शोभणारे नाही अशी भावना लातूरच्या जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.