पुणे येरवडा मनोरुग्णालयात तरुणीवर लैंगिक अत्याचार

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका मनोरुग्ण तरुणीवर पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना मागील आठवड्यात समोर आली होती. त्या प्रकरणी उस्मानाबाद मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हा येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 8, 2013, 08:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
उस्मानाबाद जिल्ह्यातील एका मनोरुग्ण तरुणीवर पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना मागील आठवड्यात समोर आली होती. त्या प्रकरणी उस्मानाबाद मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हा येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
मतिमंद आणि अनाथ तरुणीवर शासकीय येरवडा मनोरुग्णालयात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये. २२ वर्षाची पिडीत तरुणी उस्मानाबाद शहरातील एका सामजिक संस्थेच्या मतीमंद बालगृहातील आहे. उपचारासाठी ४ जानेवारी २०१२ येरवडा मनोरुग्णालयात तीला दाखल केले होते. त्यानंतर २० सप्टेंबर २०१३ ला तिला उस्मानाबादच्या संस्थेत पॅरोल रजेवर आणण्यात आले होते. तेव्हा माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार उघड झाला.
संस्थेच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली. त्यानंतर उस्मानाबाद शहर पोलिसात गुन्हा दाखल करून पुण्याच्या येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. गंभीर बाब म्हणजे मनोरुग्णालयातल्या चार कर्मचा-यांनीच हा अत्याचार केल्याचं उघड झाले आहे.
या धक्कादायक घटनेबाबत रुग्णालय प्रशासनानं हात झटकलेत. रुग्णालयात असा प्रकार घडण्याची शक्यता नाही. रुग्णाला होणारे आभास या तक्रारीमागे असू शकतात असं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र रुग्णालयातली अस्वच्छता तसेच असुरक्षित वातावरण चिंताजनक आहे. दारूच्या रिकाम्या बाटल्या, घाणीचं साम्राज्य इथली परिस्थिती समोर आणण्यास पुरेशी आहे.
शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी या रुग्णालयाला भेट दिली. राज्यातील सर्वात मोठ्या मनोरुग्नालयाची दुरवस्था यानिमित्ताने समोर आली. आता सरकारी रुग्णालयेही तरुणी, महिलांसाठी सुरक्षित राहिले नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.