www.24taas.com, पुणे
दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर सगळा देश ढवळून निघालाय. असंच एक प्रकरण पुण्यातही घडलं होतं. नयना पुजारी नावाच्या सोफ्टवेअर इंजिनिअर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. ३ वर्षांपूर्वीच्या या घटनेचा खटला कोर्टात अतिशय संथगतीनं सुरु आहे. त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे या प्रकरणातला आरोपी पोलिसांच्या अटकेत असताना पळून गेलाय. पोलीस आणि कायदा इतका हतबल असताना नयनाला खरोखरच न्याय मिळेल का, असा प्रश्न उपस्थित झालाय.
योगेश राऊत..... नयना पुजारी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातला हा आरोपी आजही मोकाट आहे... ७ ओक्टोंबर २००९ रोजी नयनावर चार नराधमांनी बलात्कार केला. लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं त्यांनी तिचं अपहरण केलं आणि त्यानंतर नैनावर बलात्कार करून तिची हत्या केली. महेश ठाकूर, योगेश राऊत, राजू चौधरी आणि विश्वास कदम या चौघांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली. मात्र योगेश राऊत हा आरोपी १८ सप्टेंबर २०११ रोजी पोलिसांच्या अटकेत असतानाच पळाला. पुणे पोलीस त्याचा आजतागायत शोध घेऊ शकलेले नाहीत. योगेश राऊत फरार झाल्यानं या प्रकरणाच्या खटल्यावरही परिणाम झाला.
योगेश राऊत हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अशाच प्रकारे आणखी एका महिलेवर बलात्कार करून तिचा खून केल्याचं त्याच्या नार्को टेस्ट मध्ये उघड झालं होतं. आज तो बाहेर आहे, याचा अर्थ असाच गुन्हा तो पुन्हा- पुन्हा करण्याची शक्यता आहे. जो पर्यंत तो हाती लागत नाही आणि सगळ्या आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत नयनाला न्याय मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया नयनाचा पती अभिजित पुजारी यांनी दिलीय.
दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा तीव्रतेनं चर्चेत आलाय. सुरक्षिततेच्या उपाययोजनांपासून ते बलात्काराच्या कायद्यात सुधारणांपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा सुरु आहे. पण, फक्त चर्चा...