www.24taas.com,झी मीडिया, तळेगाव दाभाडे
छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला तळेगाव दाभाडे इथे मंगळवारी हा प्रकार घडलाय.
या मुलीची तिच्या घराजवळ राहणारा मुलगा छेड काढत होता. त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्यास ती पालकांसह तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केला. अखेरीस या मुलीने पंचवटी कॉलनीतल्या पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस ठाण्यासमोर रास्तारोको आंदोलन केलं. तसंच संबंधित पोलिस अधिका-यावर कारवाई व्हावी अशी मागणी करत मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवला. छेडछाड करणारा मुलगा तसंच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली.
पोलीस उपअधीक्षक वैभव कलुबर्मे हे या प्रकरणाची चौकशी करून 15 दिवसांत अहवाल सादर करतील. त्या चौकशीत दोषी आढळणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिले. त्यानंतर वातावरण निवळले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.