www.24taas.com, झी मीडिया, पुणे
`मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एकाच कामासाठी पन्नास पत्रं लिहिली तरीही फाईल पेन्डिंग आहे`.... कुणा सामान्य माणसाची ही व्यथा नाही तर, खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांची ही व्यथा आहे.
पुण्यातल्या मुंढव्यात महापालिकेनं मृत जनावरांसाठी विद्युत दाहिनी उभारली आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. सध्या, मात्र हा प्रकल्प धूळ खात पडलाय. यावरुनच सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
पण, त्याचवेळी त्यांचे भाऊ अजित पवार यांच्यावर भाष्य करायचं मात्र सुप्रिया सुळेंनी टाळलं. सिंचन घोटाळ्याच्या अहवालावर प्रतिक्रिया विचारली असता, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यावर सभागृहात निवेदन केलंय... त्यामुळे मी यावर बोलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
लोकसभा निवडणुकीत मतदार आमच्यावर नाराज होते, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिलीय. `मतदार नाराज होते. हे मान्यच करावे लागेल. अन्यथा माझे मताधिक्य घटून ७० हजारांवर आलं नसतं` असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीनंतर सुळे यांनी प्रथमच या विषयावर भाष्य केलं आहे. अनेक विकास कामे केली आहेत. मात्र, तरीही अपेक्षित यश मिळाले नाही. कोठे त्रुटी राहिल्या आहेत, याचा अभ्यास करून पुढील निवडणुकीत त्या सुधारणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.