www.24taas.com, नितीन पाटोळे, पुणे
सार्वजनिक वाहतूकीची कोंडी, पाणी याबरोबरच पुणेकरांना आणखी एक समस्या भेडसावू लागलीये. शहराचा वेगानं विस्तार होत असताना कचऱ्याची समस्या अक्राळ-विक्राळ रूप धारण करत आहे. पुण्यात दररोज दीड हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे सध्या एकच मार्ग आहे, तो फुरसुंगीच्या कचरा डेपोचा. मात्र, हा मार्गही साफ नाही, पुण्याच्या कचरा समस्येवर ही खास बातमी...
ओसंडून वाहणाऱ्या कचरा कुंड्या बघितल्यावर महापालिका कामगारांचा संप असल्याचं वाटेल. पण तसं नाही... पुण्यात कचऱ्याची समस्या किती गंभीर आहे, याचा हा पुरावा म्हणता येईल आहे.. फुरसुंगीला महापालिकेचा एकमेव कचरा डेपो आहे. इथल्या ओपन डंम्पिंगला ग्रामस्थांचा विरोध आहे. त्यामुळे कचऱ्यापासून इंधन निर्मिती करणारा ब्लॉक आणि खताचा प्रकल्प महापालिकेनं उभारलाय. मात्र, हा प्रकल्पही रडत-खडतच सुरु आहे. त्यामुळे ओसंडून वाहणाऱ्या या कचरा पेट्यांचं असं दृश्य जागोजागी पाहायला मिळतं.
या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु असल्याचा महापालिकेचा दावा आहे. कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्पचा पहिला टप्पा सुरु झाला असून प्रकल्प पूर्ण झाल्यावर ७०० मेट्रिक टन कचऱ्यापासून ११ मेगावॅट विजेची दररोज निर्मिती होऊ शकेल. तसंच, ५ मेट्रिक टन क्षमतेचे १५ बयोगास प्रकल्प सुरू असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे.
वार्डातील कचऱ्याची वार्डतच विल्हेवाट लावणं, हा कचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो. त्यासाठी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे वेगवेगळे प्रकल्प महापालिका राबवू शकते. त्यादिशेनं काही प्रमाणात प्रयत्न सुरू असले, तरी ते पुरेसे नाहीत. भविष्यात विद्येचं माहेर असलेल्या पुण्यात कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याशिवाय राहणार नाही.