बॉम्बस्फोटाला वर्ष उलटलं; बॉम्बसूट कधी मिळणार?

पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना आज एक वर्ष पूर्ण होतंय. स्फोटाच्या तपासाबाबत राज्याच्या सुरक्षा यंत्रणांची पाटी कोरीच आहे

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 1, 2013, 11:22 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना आज एक वर्ष पूर्ण होतंय. स्फोटाच्या तपासाबाबत राज्याच्या सुरक्षा यंत्रणांची पाटी कोरीच आहे. अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून करायच्या उपाययोजनांच्या नावानंही बोंब आहे. कारण, पुण्यात महिनाभरात सीसीटीव्ही बसवू म्हणणाऱ्या राज्य सरकारला वर्ष झालं तरी सीसीटीव्ही बसवता आलेले नाहीत.
पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर एक वर्षापूर्वी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची दृश्यं प्रयत्न केला तरीही डोळ्यांसमोरून सहजासहजी जाणार नाहीत. बीबीडीएसच्या जवानांनी त्यावेळी बॉम्ब निकामी केले खरे मात्र, त्यासाठी जवानांना जीव धोक्यात घालावा लागला. कारण, बॉम्ब निकामी करण्याची जबादारी असलेल्या पुण्याच्या बीबीडीएस पथकाकडे बॉम्बसूटच उपलब्ध नव्हता... स्फोटांना वर्ष उलटलं तरी अजून पुण्याच्या बीबीडीएसकडे बॉम्ब सुट आलेला नाही. बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथकाला गृहमंत्री आर. आर. पाटील वर्षभरात एक बॉम्बसूट देऊ शकत नसतील तर, सामान्य पुणेकरांच्या सुरक्षेविषयी विचारायलाच नको.
आर. आर. आबांची तोंडपाटीलकी महाराष्ट्राला परिचित आहे. त्यामुळे त्यांच्या आश्वासनांकडे एक वेळ दुर्लक्ष करता येईल मात्र, स्पष्टवक्ते आणि दिलेला शब्द पाळणारे अशी ख्याती मिरवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही हीच कथा... या आश्वासनांचं काय झालं, हे सगळ्यांनाच माहीत आहे.

हे झालं राजकारण्यांच्या आश्वासनाविषयी... या घटनेची दुसरी आणि महत्त्वाची बाजू म्हणजे तपासाची... तिथेही अशीच बोंब आहे. या स्फोटांप्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आलीय. मात्र, या सर्व आरोपींना राज्याच्या एटीएसने केलेली नाही तर, दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केलीय. त्यावेळी, एटीएस प्रमुख फक्त पुण्यात बसून दररोज बैठकांवर बैठका घेत होते. पुणे पोलिसांना आणि राज्याच्या एटीएसला आरोपींच्या अटकेची माहिती कळली ती, दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर... दिल्ली पोलिसांच्या या मेहरबानीनंतर पुन्हा तपासाची स्थिती ‘जैसे थे’च आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.