www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची गाडी अडवून त्यांना शिवीगाळ करण्यात आलीय. बेकायदा बांधकामाविरोधात नागरिकांनी आयुक्तांवर रोष व्यक्त केलाय. जवळपास ५-६० जणांनी गुरुवारी दुपारी आयुक्तांची गाडी अडवून त्यांना शिवीगाळ केली.
मोहननगर भागातल्या झोपडपट्टीवर कारवाई होणार होती. त्याबाबत आयुक्तांशी भेटण्याकरता या परिसरातले झोपडपट्टीतले लोक आले होते. मात्र, आयुक्तांकडे वेळ नसल्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळं संतापलेल्या नागरिकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. यावेळी पोलिसांनी या गर्दीला ताब्यात घेतलं. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पालिका परिसरात वातावरण तणावपूर्ण असलं तरी शांत असल्याचं सांगितलं जातंय. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. पालिकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कसून चौकशी केली जातेय.
पिंपरी चिंचवडमधल्या बेकायदा बांधकामंवर आयुक्त श्रीकर परदेशी यांनी कारवाई सुरू केलीय. एकीकडे नागरिकांकडून या कारवाईचं कौतुक होत असलं तरी ज्यांची बेकायदा बांधकामं आहेत त्यांचा मात्र आयुक्तांवर रोष आहे. असं असलं तरी ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान, आयुक्त आता नेमके कुठे आहेत, याबाबत कुणालाही माहिती दिली जात नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.