इकोफ्रेंडली गणपती मूर्ती नामी, पण शाडुच्या मातीची कमी!

इकोफ्रेंडली गणेशोत्सवाकडे लोकांचा कल वाढत असल्यामुळे शाडूच्या मातीच्या मूर्तींची मागणी वाढतेय. मात्र शाडूच्या मातीची कमतरता भासत असल्यामुळे कारागिरांसमोर मोठा पेच निर्माण झालाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 13, 2013, 08:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
विघ्नहर्त्या गणेशाचं आगमन दोन महिन्यांवर येऊन ठेपलंय. त्यामुळे सगळीकडेच मूर्ती तयार करण्याच्या कामानं वेग घेतलाय. इकोफ्रेंडली गणेशोत्सवाकडे लोकांचा कल वाढत असल्यामुळे शाडूच्या मातीच्या मूर्तींची मागणी वाढतेय. मात्र शाडूच्या मातीची कमतरता भासत असल्यामुळे कारागिरांसमोर मोठा पेच निर्माण झालाय.
इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन हल्ली नेहमीच केलं जातं. त्यासाठी शाडूच्या मातीपासून तयार झालेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा सल्ला पर्यावरणवादी देत असतात. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं कारागीरांनाही शाडुंच्या मूर्ती बनविण्यास प्राध्यान्य देण्याची सूचना केलीये. मात्र शाडूच्या मातीची कमतरता जाणवत असल्यामुळे कारागिरांसमोर यक्षप्रश्न आहे. शाडुच्या कमतरतेमुळे नाईलाजास्तव प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती तयार कराव्या लागत असल्याचं कारागिर सांगतायत. तसंच प्रशासनानं शाडु उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचं ते म्हणतायत.
कारागीरांना शाडुची माती जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होईल, असं आश्वासन प्रशासनानं दिलंय. या आश्वासनानंतर कारागीरांनीही समाधान व्यक्त केलंय. मात्र पी ओ पीच्या मुर्तींपेक्षा महाग असलेल्या शाडूच्या मातीच्या मूर्ती घेण्याकडे गणेशभक्तांचा कल किती असतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.