www.24taas.com, झी मीडिया, पुणे
राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. मान्सून केवळ नावापुरताच दाखल झालाय. मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाहीय. जून अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही, असं पुणे वेधशाळेनं सांगितलंय.
पाऊस सक्रिय होण्यासाठी बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणं आवश्यक आहे, मात्र अशी परिस्थिती सध्या नसल्यानं पुढच्या चार ते पाच दिवसात पावसाची कोणतीही शक्यता नाही. नानौक चक्रीवादळामुळं मान्सूनच्या प्रवाहाची तीव्रता कमी झाल्यानं त्याचाही परिणाम पावसावर होणार आहे.
पावसाअभावी मुंबईकरांच्या घामाच्या धारा सुरूच आहेत. राज्याच्या कुठल्याही भागात सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. त्यामुळं खरीपाचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. पाऊस कधी येणार याकडं बळीराजा डोळे लावून बसलाय.
पावसाअभावी कोकणातलं भातशेतीचं गणित बिघडण्याची चिन्हं आहेत. इथं दुबार पेरणीची पाळी शेतकऱ्यांवर येणाराय. पुणेकरांवर कधीही पाणी कपातीचं संकट ओढवू शकतं. कारण पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा आहे.
सोलापुरातील उजनी धरणंही पार आटलंय. मराठवाड्यात केवळ 20 टक्के एवढा पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. जायकवाडीतून 4 दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. आधी दुष्काळ, मग गारपीट आणि आता पुन्हा अस्मानी संकट मराठवाड्यावर ओढवलंय.
नाशिकमध्ये 15 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाअभावी खरीपाचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जातेय. तर विदर्भात पाऊसच पडलेला नसल्यानं तापमान 39 अंशापर्यंत वाढलंय. शिवाय इथंही दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर कोसळलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.