www.24taas.com, पुणे
अधिकाधिक लोकांनी बसने प्रवास करावा, यासाठी 1 नोव्हेंबरला धुमधडाक्यात बस डे साजरा करणाऱ्या पीएमपीने मात्र विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणली आहे. पुणे, पिंपरी आणि चिंचवडमधील गेल्या दोन वर्षांपासून सुरू झालेल्या शासन मान्यताप्रप्त प्रशिक्षण शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पास देणं बंद केलं आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे.
पीएमपीचा मासिक पास १२०० रुपयांना मिळतो. अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना यामध्ये सुट मिळते. ज्येष्ठ नागरिकांना हा पास साडे तीनशे रुपयांना मिळतो, तर विद्यार्थ्यांना पाचशे रुपये भरावे लागतात. या बसने कुठेही प्रवास करण्याची परवानगी असते. शहरी तसंच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही या पासाचा फायदा होतो.
मात्र पीएमपीने ऑक्टोबरपासून हा पास बंद केला आहे. त्यामुळे या पासावर शिक्षण घेत असलेल्या हजारे गरीब विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. पीएमपीने केवळ जुन्या शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठीच ही सोय चालू ठेवून गेल्या दोन वर्षांमध्ये सुरू झालेल्या प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी पास बंद केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत.यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी विद्यार्थ्यांची इच्छा आहे.