पुणेकरांचं ८०० कोटींचं नुकसान!

पीएमपीएल एक हजार नव्या बसेस खरेदी करत आहे. मात्र त्यासाठी सीएनजीऐवजी डिझेल बसेसचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या व्यवहारात पुणेकरांचं तब्बल ८०० कोटींचं नुकसान होणार आहे. शिवाय या व्यवहारात अनेक घोळ आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 29, 2013, 05:54 PM IST

अरुण मेहेत्रे, www.24taas.com, पुणे
पीएमपीएल एक हजार नव्या बसेस खरेदी करत आहे. मात्र त्यासाठी सीएनजीऐवजी डिझेल बसेसचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या व्यवहारात पुणेकरांचं तब्बल ८०० कोटींचं नुकसान होणार आहे. शिवाय या व्यवहारात अनेक घोळ आहेत.
पुण्यात पीएमपीएलच्या ताफ्यात सध्या १८०० बसेस आहेत. त्यापैकी ५०० बसेस नेहमीच नादुरुस्त असतात. पुण्याची गरज भागवण्यासाठी रोज किमान २००० बसेस रस्त्यावर धावणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत १००० नव्या बसेस घेण्याचा निर्णय झालाय. मात्र या बस खरेदीच्या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
१. शहरामध्ये प्रदूषण कमी करणा-या वाहनं असावीत, असे शासनाचे निर्देश असताना सीएनजीऐवजी डिझेल बसेसचा आग्रह का ?
२. अशोक लेलँड कंपनीनं याआधीची ऑर्डर वेळेत पूर्ण केली नसल्यानं या कंपनीला ब्लॅक लिस्टेड करण्यात आलंय. असं असताना पुन्हा अशोक लेलँडकडूनच बसेस खरेदी कशासाठी?

३. या व्यवहारासाठी एकरकमी पैसे न देता प्रति किमी 7 साडे बारा रुपये सात वर्षांसाठी द्यावे लागणार आहेत. या व्यवहारात पुणेकरांना सुमारे ८०० कोटींचा फटका बसणार आहे.

या पार्श्वभूमीवर ही बस खरेदी नेमकी कुणाच्या हिताची असा प्रश्न पुणेकरांना पडलाय. या बस खरेदीसंदर्भात प्रशासनाची भूमिकाही स्पष्ट नाही. बस खरेदीचा हा प्रस्ताव सध्या विचाराधीन असल्याचं संचालकांली म्हंटलंय.
ढिसाळ व्यवस्थापन, दूरदृष्टीचा अभाव आणि गैरव्यवहारांमुळे पीएमपीएल नेहमीच वादाच्या भोव-यात राहिली आहे. नागरिकांच्या सोयीची ठरण्याऐवजी आता पुन्हा पीएमपीएल पुणेकरांच्या नुकसानाचाच घाट घालत आहे.