www.24taas.com, पुणे
`स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच...` हे वाक्य उचारणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या आवाजाची ध्वनीमुद्रिका मिळाली आहे. हा एक ऐतिहासिक ऐवज आहे.
ब्रिटीश सत्तेला हादरा देणाऱ्या लोकमान्य टिळकांची छायाचित्रे उपलब्ध आहेत, लोकमान्यांचे केसरी आणि पुस्तक रूपातील विचारधन देखील उपलब्ध आहे आणि आता लोकमान्य टिळकांचा आवाज असलेले ध्वनिमुद्रणही उजेडात आले आहे. केसरी मराठा ट्रस्टचे अध्यक्ष आणि लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी ही माहिती दिली. २४ ऑगस्ट रोजी टिळकांचा आवाजातील ही ध्वनिमुद्रिका खुली केली जाणार आहे.
२१ सप्टेंबर १९१५ रोजीची ही ध्वनिमुद्रिका आहे. त्यावेळच्या गणेश उत्सवात हे ध्वनिमुद्रण करण्यात आले होते. सेठ लखमीचंद नारंग यांनी १९१० मध्ये अमेरिकेतून 'केपहार्ट' कंपनीचे ध्वनिमुद्रण यंत्र मागविले होते. याच यंत्रावर १९१५ मध्ये केसरीवाड्यात झालेला गायनाचा कार्यक्रम ध्वनिमुद्रित करण्यात आला. विशेष म्हणजे, हे यंत्र आजही चालू स्थितीत आहे. सेठ नारंग कराचीहून हे यंत्र घेऊन पुण्यात दिग्गजांच्या मैफलींना येत. सेठ नारंग यांचे १९३९ मध्ये कराचीत निधन झाले. मृत्यूपूर्वी मास्टर कृष्णराव अथवा बालगंधर्व यांचे गायन ऐकण्याची नारंग यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी कराची येथून स्वतःचे खास विमानही पाठविले होते. पण, हा योग जुळून आला नाही. ही ध्वनिमुद्रिका उपलब्ध झाल्यामुळे ९२ वर्षानंतर पुण्यात पुन्हा टिळकांचा आवाज घुमणार आहे.